कोरोना काळात शासकीय रूग्णालयांचे योगदान उल्लेखनीय:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-
कोरोना साथरोगाशी आज सर्व जग लढा देत आहे. या काळात नाशिक जिल्ह्यातील मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेत सर्वात कमी राहीला आहे. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे आहे. कोरोना कळात शासकीय रूग्णालयांनी त्यांच्या अविरत सेवेतून उल्लेखनीय योगदान दिले आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज मुलतानपुरा येथील नाशिक महानगरपालिका संचलित सैय्यदानी माँजी साहेब प्रसुतिगृह, मौलानाबाबा व्यायमाशाळा यांचे उदघाटन व मौलानाबाबा व्यायामशाळा ते दुधबाजार रस्ता व काझीपुरा चौकी ते आझाद चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, माजी मंत्री शोभा बच्छाव, नगरसेवक सुफीयान जीन,रंजन ठाकरे,माजी नगरसेवक वत्सलाताई खैरे, मौलाना मोहसिन मियाँ, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज नाशिक महानगरपालिका निधीतून 3 कोटी 50 लक्ष निधीतून 20 खाटांचे सुसज्ज व अद्ययावत सैयदानी माँजी साहेब प्रसुतिगृहाचे काम, 2 कोटी 50 लक्ष निधीतून मौलानाबाबा व्यायामशाळा व 3 कोटी 50 लक्ष निधीतून मौलानाबाबा व्यायामशाळा ते दुधबाजार रस्ता व काझीपुरा चौकी ते आझाद चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे कामाचे भूमिपूजन लोकप्रतिनधींच्या सहकार्यातून साकार होत आहे. कोरोना काळात स्वत:ची व कुटूंबिंयांची काळजी हे सर्वांचेच प्रथम कर्तव्य आहे. दुस-या लाटेच्या तुलनेत आता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा ऑक्सीजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. आगामी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांनी आरोग्यभान राखून मास्क, सॅनिटायझर व सामजिक अंतर या त्रिसूत्रीचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना केले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मैनोद्दीन कोकणी यांची कन्या मुजयाना हिचा माध्यमिक शालांत परिक्षेत 84.00 टक्के गुण मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. छगन भुजबळ म्हणाले की, आज समाजात मुलींचे शिक्षण महत्वाचे आहे. स्त्रीशिक्षण हा सामाजिक उन्नतीचा पाया असून, स्त्रीशिक्षणाची मूहर्तमेढ करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ज्ञानज्योत मुलींना शिक्षण देवून आपण सर्वांनी तेवत ठेवायची आहे. यावेळी नगरसेव‍क सुफीयान जीन यांना जन्मदिवसाच्या तर उपस्थित नागरिकांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव आपले मनोगत व्यक्त करतांना यावेळी म्हणाले की, आज सर्वसोयीयुक्त सुसज्ज प्रसुतिगृह व अत्याधुनिक व दर्जेदार साधनांनी परिपूर्ण असलेल्या व्यायामशाळेचे उदघाटन व रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन हे लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून साध्य होत आहे. या सर्व आधुनिक सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.जाधव यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *