के.जे.सोमैया महाविद्यालयात कै. विलासराव देशमुख यांचे पुण्यस्मरणा निमित्त अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव दि.
“महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक – सांस्कृतिक विकासात माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्यात व केंद्रात अनेकदा मंत्री व मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले कार्य आज सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” असे उद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी काढले. ते कै. विलासराव देशमुख यांच्या ९व्या पुण्यस्मरणानिमित्त के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. ऍड. संजीवदादा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी कै. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करताना महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण व समाजविधायक विविध उपक्रमांची माहितीही उपस्थितांना दिली. तसेच केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित ‘एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय’ म्हणून अहमदनगर जिल्ह्यातून केवळ आपल्या महाविद्यालयाला हा पुरस्कार कालच प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्गाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव मा. ऍड. संजीवदादा कुलकर्णी, सदस्य मा. संदीप रोहमारे यांनीही कै. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद व कार्यालयीन कर्मचारी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

फोटो ओळ :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना मा. अशोकराव रोहमारे, ऍड. संजीवदादा कुलकर्णी, मा.संदीप रोहमारे व प्राचार्य डॉ. बी.एस. यादव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *