
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्याच्या पश्चिम भागातील पोहेगांव परिसरातील ११ गावांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहीर लाभापासून वंचित ठेवण्यात आले असून त्यांना पूर्ववत फायदे लागू करून या लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनकाळात या योजनेचा निधी दिड लाखावरून 3 लाख रुपये पर्यंत वाढवले होते. भूजल सर्वेक्षणात या गावांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित योजनेपासून ही गावे वंचित राहिले आहेत. शासन स्तरावर पत्रव्यवहार व पाठपुरावा करून परिसरातील गावांना या योजनेचा पुन्हा लाभ देण्यात यावा हवा म्हणून सौ कोल्हे यांनी मंत्री महोदयाकडे मागणी केली आहे. या परिसरातील ही ११ गावे जिरायती असून येथील शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत व्हावी म्हणून सदर योजनेचे अनुदान दीड लाखावरून ३ लाख रूपये करण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात भरघोस वाढ केली. भूजल पातळी या भागात कमी आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरी घेतल्या जातात, तेव्हा शासनाने याबाबत वेळीच लक्ष घालून परिसरातील शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवावा असे सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.
