के.जे.सोमैया महाविद्यालयात ग्रंथालय दिन व ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- “सुसुंस्कृत आणि सभ्य समाजाच्या निर्मीतीसाठी औपचारिक शिक्षणाबरोबरच निरंतर वाचन आवश्यक असते, याचसाठी ग्रंथालय शास्त्राचा विकास झाला. देशात व एकूणच जगात सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांनी केले म्हणूनच संपूर्ण देशभरात डॉ.रंगनाथन यांची जन्मदिवस ‘ग्रंथालय दिन’ म्हणून साजरी केला जातो. असे प्रतिपादन प्रा. डॉ. पी.जी.जोशी यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने ‘ग्रंथालय-दिना’ च्या निमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या वार्षिक सभेचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एस यादव हे होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले की, “आजच्या डिजिटल युगामध्ये देखील वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम ग्रंथालयांच्या माध्यमातून केले जात आहे. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय एक भव्य आणि समृद्ध ग्रंथालय आहे.” येथे हजारो ग्रंथ आणि मासिकांबरोबरच अनेक ई-ग्रंथ व ई-जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग विद्यार्थी व संशोधकांनी करून घ्यावा. वाचनाने माणसाचे आंतरिक व्यक्तिमत्व विकसित होते. देशाच्या इतिहासातील व एकूणच जागतिक कीर्तीचे अनेक वैज्ञानिक, महापुरुष, लेखक, समाज सुधारक हे आदी मुळेच घडले असल्याचेही ते म्हणाले.
महाविद्यालयाचे माजी कार्यालय अधीक्षक श्री. संभाजी नाईक म्हणाले की, “डॉ. एस.आर.रंगनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रंथालय चळवळीसाठी वेचले. त्यांचे जीवन व कार्य थोर आहे. त्यांच्या जयंती निमित्त आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना महाविद्यालयात येण्याची संधी प्राप्त झाली याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आम्हाला हवा असलेला एखादा महत्वाचा ग्रंथ घरपोच मिळाला तर आमचा आनंद आणखी वाढेल. ग्रंथपाल नीता शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हाट्सअँप ग्रुप सुरु केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
एका आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी जगतात ग्रंथापेक्षा मोबाईल व संगणकाचे प्रस्थ वाढले आहे. तरीही या माध्यमातूनही विद्यार्थी आपल्या वाचनाची भूक शमवू शकतात, कारण आज मोबाईलवर सर्व वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिकांसोबतच अनेक मौल्यवान ग्रंथसंपदाही उपलब्ध असल्याचे ही प्रा. शिंदे म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, “महाविद्यालयात विविध विभागांच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. आजचा ग्रंथालय दिन व ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक सभा हा असाच एक उपक्रम आहे. या निमित्ताने आम्ही ज्येष्ट नागरिकांसाठी एक व्हाट्सअँप ग्रुप सुरु करून त्यामाध्यमातून विविध विषयांचे उत्तम ग्रंथ डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. भविष्यात देखील असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे एक ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ टी.आर.पाटील, डॉ.निर्मला कुलकर्णी, श्री.विलास नाईक, श्री. शरद घाटे, श्री. अशोकराव आढाव, श्री. बी.आर.शिंदे, श्री. सुभाष बनकर आदी ज्येष्ट नागरिक तसेच प्राध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग सामाजिक अंतराचे पालन करून उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल प्रा.निता शिंदे यांनी डॉ.एस.आर रंगनाथन यांनी ग्रंथालय चळवळीसाठी घेतलेल्या परिश्रमाचे विस्तृत विवेचन केले तसेच ग्रंथालय दिनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे श्री. बाळासाहेब पानगव्हाणे, श्री. स्वप्निल आंबरे, श्री. रवींद्र रोहमारे व श्री. अविनाश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ १:- ग्रंथालय दिनानिमीत्त आयॊजीत विशेष ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथ बघताना मान्यवर, समवेत ग्रंथपाल, प्राध्यापक वृंद व ग्रंथालय विभागाचे कर्मचारी.


फोटो ओळ २:- ग्रंथालय दिनानिमीत्त आयॊजीत कार्यक्रमानंतर मान्यवरानी ग्रंथालयाला भेट दिल्यानंतर ग्रंथालय इमारती समोर मान्यवरां समवेत ग्रंथपाल, प्राध्यापक वृंद व ग्रंथालय विभागाचे कर्मचारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *