
कोपरगांव प्रतिनिधी:- साहित्यिक माणुसच असतो पण तो सजगपणे संवेदनशिलतेने समाजातील सुखदुःख पहातो . त्यामुळे कुठेही घडणाऱ्या घटना दुर्घटना त्या निमित्ताने येणाऱ्या क्रिया प्रक्रिया आणि त्यातील एखादा शब्द मनाला भिडला तर त्या शब्दावर कथा , कविता , लेख निर्माण होतो असे विचार जेष्ट साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले . येथील कु.श्वेतांबरी रमेश राऊत यांनी गितकार बाबासाहेब सौदागर यांचे आत्मचरित्र ‘ पायपोळ ‘ यावर एम.फिल साठी प्रबंध सादरकेला होता . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच त्यांना एम फिल पदवी बहाल केली आहे . यासाठी त्यांना प्रा . डॉ.सौ.शीला गाडे यांचे मार्गदर्शन मिळाले . एम फिल पदवी मिळाल्या निमित्ताने चंद्रमा कलर फोटोच्या वतीने त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . स्वागत व प्रास्तविक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी केले . त्यावेळी प्रास्तविक करतांना ते म्हणाले की , समाजजीवनात अनेक स्थित्यंतरे घडतात . त्याची नोंद साहित्यिक आपल्या साहित्यातून देत असल्याने पुढच्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरते . कवी आणि गीतकार बाबासाहेब सौदागार यांचे आत्मचरित्र नव्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे . त्यांच्यावरील आजीचे संस्कार आणि त्यातून होणारी साहित्य निर्मिती नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देणारी आहे . समारंभासाठी वात्रटिकाकार कवी अविनाश पाटील , सांची वेलफेअर फाउंडेशनचे रविंद्र साबळे , सामाजिक कार्यकर्ते किरण कासारे आदि मान्यवर उपस्थित होते . सत्काराला उत्तर देतांना कु.श्वेतांबरी राऊत म्हणाल्या की चंद्रमा कलर फोटोने केलेला सत्कार निश्चितच प्रेरणादायी आहे . यापूर्वीही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना एस एस जी एम महाविद्यालयाचे छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी अनेकवेळा मार्गदर्शन करुन प्रेरणा दिली आहे . आज या सत्काराने एक वेगळा आनंद प्राप्त झाला आहे . शेवटी सौ.मंगल भवर यांनी सर्वांचे आभार मानले .
