
कोपरगाव प्रतिनिधी:-
धरणक्षेत्रात पुरेसा होउन धरणामध्ये पाणी साठा असुनही कोपरगाव करांना मात्र 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, ही नित्याचीच परिस्थिती झाली आहे. कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर कोपरगावला बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असलयाचे मत श्री विजय गोरक्षनाथ आढाव यांनी व्यक्त केले.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री आढाव यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या पावसाळा सुरू आहे, तरीही कोपरगावकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. राज्यकर्त्यासह
सर्वांनाच आत्मचिंतन करणारी ही बाब आहे. वास्तविक कोपरगाव शहराला पाणी देणा-या तलावांची संख्या जरी वाढली तरी शहराला शुध्द व नियमित पाणी मिळणे अशक्यच आहे.गोदावरी डाव्या कालव्यातून वाहुन येणारे पाणी हे कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलावात येते. उघडया कालव्याद्वारे येणारे पाणी शुध्द येईलच असे नाही, त्यात नाशिक शहराचे सांडपाणीही या कालव्याद्वारे कोपरगावच्या पिण्याच्या साठवण तलावापर्यंत पोहचते. त्याचप्रमाणे धरणापासुन ते साठवण तलावापर्यंत येणा-या पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होते, उघडया कालव्यातून येणारे हे पाणी मोठया प्रमाणात दूषित असते. त्यामुळे कोपरगावकर नागरीकांच्या आरोग्याचे काय ? हाही प्रश्न आहे.
कोपरगाव शहराची लोकसंख्या विचारात घेता कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठीची उपाययोजना नाही, गेल्या 30 वर्षापासून अधिक काळापासून शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. वारंवार उदभवणा-या या समस्येंवर निष्चित असा तोडगा निघालेला नसल्याने कोपरगावकर नेहमीच पाण्यापासून वंचित राहीला आहे. परंतु नेहमी या प्रश्नावर राजकारण केले जाते तसेच विधानसभा निवडणुकीपुर्वी कोपरगाव करांच्या पिण्याच्या पाण्यावर राजकारण झाले, शुध्द व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या वल्गना झाल्या. परंतु कोपरगावकर मात्र आजही तहानलेलाच आहे.
दक्षिण गंगा गोदावरीच्या काठावर असलेल्या कोपरगावकरांच्या नशिबी पिण्याच्या पाण्यासाठी अशी अवस्था वाटयाला येणे हे निष्चितच दुदैव आहे.
चौकट
विद्यमान लोकप्रतिनिधींनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात राजकारण न करता कुठून आणा परंतु बंद पाईपलाईनद्वारे कोपरगावकरांसाठी पाणी आणा. जेणेकरून शहरवासीयांना दररोज शुध्द पाणी मिळेल आणि आरोग्य अबाधित राहील.
