
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मागील चार वर्षापासून कोपरगाव नगरपरिषदेला घरकुलासाठी केंद्र सरकारकडून त्यांच्या हिश्याची रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील ५०० पात्र लाभार्थ्यांचे घरकुल आजही अपूर्णावस्थेत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी दिली आहे.
याबाबत कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिंगबर वाघ यांच्याकडून नगरसेवक मंदार पहाडे यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीअंती हि धक्कादायक माहिती समोर आली आहे २०१७ पासून आजवर केंद्र शासनाकडून जवळपास ५०० घरकुलासाठी त्यांच्या हिश्याची रक्कमच कोपरगाव नगरपरिषदेला मिळालेली नाही.राज्यशासनाच्या हिश्याची रक्कम नगरपरिषदे जमा आहे. त्या रक्कमेचे वाटप पात्र लाभार्थ्यांना होवून त्यांच्या घरकुलाचे काम निम्म्यावर आले आहे. मात्र केंद्राचा वाटा न आल्यामुळे पुढील कामासाठी निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे या घरकुल लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे काम थांववावे लागले आहे. पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे ज्या नागरिकांचे घरकुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे अशा नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असून जे काम पूर्ण झाले आहे त्याचे देखील नुकसान होण्याची शक्यात नाकारता येणार नाही.
या पात्र लाभार्थ्यांचे हक्काचे घरकुल लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने देखील मुख्य अभियंता क्रमांक २ म्हाडा कलानगर, बांद्रा मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करावा. मुख्य अभियंता क्रमांक २ म्हाडा कलानगर यांनी देखील केंद्रीय स्तरावर कोपरगाव नगरपरिषदेला केंद्र सरकारच्या हिश्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांचे हक्काचे घरकुल पुर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला असल्याचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी सांगितले आहे.
