
कोपरगांव प्रतिनिधी:-
पावसाळ्यात ग्रामीण भागात वीज पडून मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून आकाशातून कोसळणा-या विजेला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय इमारतींवर विज रोधक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सौ.कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,वीज पडून अनेकवेळा शेतकरी कुटुंबातील नागरिकांसह मजुरी करुन आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणा-या नागरिकांना विजापांसून मोठ्या प्रमाणात क्षती पोहचत असते याचा फटका शेतात काम करणा-या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस हानी पोहचून कधी-कधी अपंगत्वही येते तर काहींना आपल्या प्राणास मुकावे लागते त्यामुळे शेतकरी व गोर-गरीब कुटुंबातील नागरिकांच्या जीवनमानावर याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊन कुटुंबाची मोठी हानी होते.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून ग्रामीण भागात ऐन पावसाळ्यात काम करणा-या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय इमारतींवर वीजरोधक यंत्रे बसविण्यात यावे जेणेकरुन खेड्यापाड्यातील नागरीकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला व परतीच्या वेळी वीज पडण्याचे प्रमाण विशेषत: ग्रामीण भागात अधिक असते,वीज पडून अनेक वेळेस जीवीतहानीसह वित्तहानी होते.आकाशातून पडणा-या वीजांमध्ये विजेचा प्रवाह प्रचंड असतो अशावेळी वीज पडून होणा-या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहचत असते त्याकरीता ग्रामीण भागातील सर्व शासकीय इमारतींवर तातडीने वीजरोधक यंत्रे बसविण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी सौ.कोल्हे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
