

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान यांचे अधिपत्याखालील कोपरगाव तालुक्यातील तीन महादेव मंदिर येथील व्यवस्थापन पहाणे कामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुशांत घोडके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती श्रीमंत पवार सरकार संस्थानचे श्रीमती मेनका राजे यशवंतराव पवार व राजकुमारी उदयादेवी रुद्रेंद्रसिंग यांचे जनरल मुखत्यार महेंद्र(बाळासाहेब)पाटील नरोडे यांनी दिली आहे.
श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील तीन महादेव मंदिरामध्ये कोपरगाव जुना गावठाणातील वेशी समोर, पवार सरकार वाडा जवळ,सराफ बाजारात असलेले श्री सोमेश्वर महादेव मंदिर,बेट-कोपरगांव येथे असलेले संजीवनी पार जवळील श्री महादेव मंदिर,जेऊरकुंभारी गोदावरी काठावरील पवार सरकार वाडा जवळ श्री महादेव मंदिर यांचा समावेश आहे.



श्री महादेव मंदिर तीनही धार्मिक स्थळांचे ऐतिहासिक वास्तू म्हणून ठेवा जतन करणे.सेवा कार्यात शिवभक्त भाविकांचा सहभाग घेणे.परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी नियमित करणे,सण-उत्सव-यात्रा यासह शासनाचे शांतता कमिटी व्दारे येणारे विविध बैठकीत उपस्थित राहून योग्य निर्णय घेणे.श्री महादेव मंदिर नियमित स्वच्छता,पुजा,आरती धार्मिक कार्य बाबत जबाबदारी निश्चित करुन नियोजन करणे.भक्तांचे नियमित बैठक घेणे.श्री महादेव मंदिर संदर्भात विविध कार्य करणे.यासह विविध जबाबदारी देण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यासह जिल्हा, राज्य व देशपातळीवर विविध समितीवर निरपेक्ष भावनेने स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके हे कार्य करत आहे.सार्वजनिक क्षेत्रात २१ वर्षांपेक्षा जास्त काळ योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांचा सण-उत्सव-परंपरा, इतिहास संशोधनात करत असलेले कार्य आणि व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
कोपरगाव पंचक्रोशीतील विविध उपक्रमात भरीव योगदान देणाऱ्या सुशांत घोडके यांचे निवडीबद्दल पंचक्रोशीतील साधू-संत-महंत यांनी शुभ आशिर्वाद कळवले असून शिवभक्तांकडून अभिनंदन होत आहे.
