
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्याच्या कोरोना महामारीमध्ये शेतकरी आर्थीक संकटात सापडलेला आहे, खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीसह पिके उभे करण्याची चिंता भेडसावत आहे सन 2020-21 या कालावधीमध्ये काढलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामाची रक्कम अदयापपर्यंत शेतक-यांना मिळालेली नाही. त्यामुळे या शेतक-यांना किमान उत्पन्नावर आधारीत रक्कम देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांचेकडे केली आहे.
खरीप हंगाम सन 2020-21 या वर्षीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. या साठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या शासन निर्णय क्रमांक प्रपीवियो-2020/प्र.क्र.40/11-अे दि.29 जून 2020 अन्वये पिक विमा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत बाजरी, भुईमूग,सोयबिन,तूर,कापूस, मका आणि कांदा पिकांचा समावेश होता. यासाठी कोपरगाव तालुक्यात सुमारे 22 हजार लोकांनी विविध पिकांचा विमा उतरविला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या होत्या, सदर कंपनीकडून नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. सुमारे 22 हजार शेतक-यांनी विमा उतरविलेला असतांना केवळ 1700 शेतक-यांनाच नुकसानीची भरपाई मिळाली आहे. उर्वरीत शेतकरी यापासून वंचित राहिले आहे.
गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीचे संकट आहे. हाताशी आलेल्या पिकांनाही बाजारपेठ नसल्यामुळे शेतक-यांपुढे आर्थीक विवंचना आहे, दळणवळण, बाजारपेठा बंद असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या परिस्थितीमध्ये त्यांना विम्याची रक्कम मिळाली तर चालू हंगामात पिके उभे करण्यास हातभार लागेल. त्याकरीता सन 2020-21 मध्ये काढलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामाची किमान उत्पन्नावर आधारीत रक्कम शेतक-यांना मिळावी, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.
