
कोपरगाव प्रतिनिधी:-
संपुर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारे,सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे.प्रशासकीय यंत्रणा तर जीव धोक्यात घालून दिड वर्षांपासून कोरोना योद्धे बनूनच काम करत आहेत.याच प्रयत्नांत अनेकांचा बळीही गेलेला आहे.संपुर्ण देश कोरोनामुळे हैराण झालेला असतांना काहीजण मात्र जाणीवपूर्वक “कोरोना टेस्टिंग व लसीकरण मोहिम ” हाणून पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत असा संशय यायला लागला आहे.आरोग्य विभाग व कोपरगाव नगरपरिषदही स्वखर्चातून प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांचे टेस्टिंग करण्याची मोहिम राबवत आहे.मोफत टेस्टिंग असूनही नागरिक मनापासून प्रतिसाद देत नाहीत असाच अनुभव येत आहे.अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी,लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत.पण असे अनुभवाला येत आहे कि काही ठराविक लोक हेतुपुरस्सर टेस्टिंगसाठी यायला तयार नाहीत.इतरवेळी शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगा लावणारे,लाभ घेणारे टेस्टिंग व लसीकरण करून घ्यायची टाळाटाळ करत आहे.आता शासनाने कठोर भूमिका घेऊन देशातल्या प्रत्येक नागरिकाला यासाठी सक्तीच केली पाहिजे.
टेस्टिंग व लसीकरण करणाऱ्यानाच फक्त सर्व शासकीय योजनांचे लाभ दिले पाहिजेत.जे जे लोक शासकिय आदेश पाळणार नाहीत त्यांचे रेशन,पिवळे रेशन कार्ड,गॅस सबसिडी,पंतप्रधान आवास योजना,सर्व शासकिय अनुदाने,वेतन,आर्थिक लाभ बंद केले पाहिजेत.
मास्क वापरायचे नाहीत,कोरोना विरूद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांचे लाड बंद करा.देशातील एक मोठा वर्ग असे नियमबाह्य व धोकादायक वर्तन करत असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल? राजकारण्यांनी सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना टेस्टिंग-लसीकरण सक्तीचे केले पाहिजे.मतांचा विचार न करता कायदे राबवा.अन्यथा अजून लाखो बळी गेल्याशिवाय राहणार नाहीत.शासकिय लाभ घ्यायचे-हक्क गाजवायचे पण कर्तव्य करायचे नाही हे चालूच देऊ नये ही नम्र विनंती.
अशी मागणी विजय वहाडणे यांनी मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांना पत्रकाद्वारे केली.
