
कोपरगांव प्रतिनिधी:-
सध्या कोरोनाच्या अतिशय वाईट संक्रमणाचा काळ असून कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी समाजातील विविध सामाजिक संस्था काम करत आहे. कोरोनासारखी महामारी हद्दपार करण्यासाठी सर्वच आपापल्या परीने सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे, त्यातच कोपरगांव तालुक्यातील युवानेते विवेक कोल्हे यांनी आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे संजीवनी कोविड सेंटर उभारुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम केलेले आहे. संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोनाबाधीत रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या वतीने सर्व यंत्रणा उभी करुन रुग्णांची काळजी घेत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोपरगांव तालुक्यातील युवकांनी श्री कोल्हे यांचा सत्कार करण्याचे ठरविले मात्र ज्या दिवशी मतदारसंघ कोरोनामुक्त होईल त्याच दिवशी आपण सत्काराबाबत विचार करु तसेच सध्याची वेळ ही सत्काराची नसून सत्कार्याची आहे असे आवर्जून सांगितल्याने आम्हां युवकांना त्यांच्या विचाराने उभारी व प्रेरणा मिळाली असे अनुराग येवले यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले की, खरा सत्कार कोरोनात अहोरात्र लढणारे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स,वैद्यकीय कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस अधिकारी यांचा करायला हवा तेव्हाच आपण खरी लढाई जिंकल्याचे आपणा सर्वांना समाधान होईल.रुग्णसेवेच्या माध्यमातून दुर्देवाने संक्रमण झालेल्या रुग्णांना उपचारासोबत मानसिक आधाराचीही खरी गरज असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले व आपण प्रत्येकजण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने कार्य केल्यास कोरोना नक्कीच हद्दपार होईल असा विश्वासही या वेळेस त्यांनी व्यक्त केला.
