संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….


कोपरगाव प्रतिनिधी:-
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर राज्यात अग्रक्रम मिळविणाऱ्या संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सन १८७१ मध्ये २७ जुलै रोजी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक शाळेने आज १५५ वर्षांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास पूर्ण करताना नव्या यशाचा आणखी एक टप्पा गाठला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये सुजय सुनील भोसले या विद्यार्थ्याचा पन्नासावा प्रवेश करण्यात आला. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पालकांनी दाखविलेला हा विश्वास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून साजरा केला.
कार्यक्रमात कोपरगाव येथील कलाशिक्षक श्री. अमृतकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला कार्यशाळा आयोजित केली. चित्र रंगविण्याच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक, रंगसंगती, कल्पकता आणि सर्जनशील अभिव्यक्ती याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर उधळण दिली.
आज संवत्सर जिल्हा परिषद शाळा राज्यातील प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डिजिटल शिक्षण, कौशल्याधारित उपक्रम, संस्कारवर्ग, पर्यावरण संवर्धन, कला, क्रीडा आणि विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शाळेने शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशामागे शाळेचे मार्गदर्शक श्री. राजेश परजणे पाटील, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, तसेच ग्रामस्थ आणि पालक यांचे लाभलेले बहुमोल सहकार्य मोलाचे ठरले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे शाळेची प्रगती दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असून शिक्षण क्षेत्रात ती प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साह, आनंद आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला.शाळेचे मुख्याध्यापक श्री फैय्याजखान पठाण यांनी यावेळी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला . विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
