आ.आशुतोष काळेंचा आक्रमक पवित्राकारणे न सांगता जास्तीत जास्त युरिया पुरवठा करा युरिया कंपनी प्रतिनिधींना आ.आशुतोष काळेंनी खडसावले, युरिया सप्लायर कंपन्या कोपरगावला देणार ०२ हजार टन युरिया…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन कारणे सांगू नका, युरिया किती देणार ते सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात ०२ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे.
रब्बीचा हंगाम सुरू असतांना शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत उपलब्ध होत नाही त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्रव्यवहार करून कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना केल्या होत्या परंतु अजूनही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.०८) रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन त्यांची चांगलीच झाडा झडती घेवून त्यांना चांगलेच खडसावले आहे. मला कारणे नको, युरिया किती देणार याचा आकडा सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एक महिन्यात ०२ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याची ग्वाही जिल्हा कृषी अधीक्षकांच्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ.आशुतोष काळे यांना दिली आहे.

मागील वर्षीचा कोपरगाव तालुक्याचा युरियाचा कोठा युरिया सप्लायर कंपन्यांनी पूर्ण न केल्यामुळे ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई जाणवत आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे बदललेली पीक पद्धती व मका क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे युरियाची टंचाई अधिकच जाणवू लागली आहे तसेच युरिया घेतांना युरिया विक्रेते शेतकऱ्यांना लिंकिंग अर्थात युरिया सोबत इतर पुरवणी कृषी औषधांची खरेदी करण्याचा आग्रह करीत आहे त्यामुळे शेतकरी अजूनच अडचणी सापडला आहे. शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी बैठक घेऊन युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना चांगलेच खडे बोल सुनावले.कोपरगाव तालुक्याला आवश्यक असलेला युरिया कोठा का पूर्ण केला जात नाही? अशी विचारणा करून युरिया खात्यासोबत इतर कृषी औषधांची व खतांची खरेदी करण्याचा आग्रह कमी करा. कृषी सेवा केंद्र चालक व वितरकांना जास्त लिंकिंगचा आग्रह धरू नका जेणेकरून त्यांचे मार्फत शेतकऱ्यांना लिंकिंग न करता युरिया पुरवठा करणे सोयीचे होईल अशा कडक सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी संबंधित युरिया सप्लायर कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.
शेतकरी अडचणीत आहेत त्यांच्या अडचणी अजून वाढवू नका. कोपरगाव तालुक्याला युरिया किती देणार एवढेच मला सांगा असा आक्रमक पवित्रा आ.आशुतोष काळे यांनी घेतल्यामुळे संबंधित युरिया सप्लायर कंपनीच्या प्रतिनिधींनी आपापल्या कंपनीकडून किती युरिया खताचा पुरवठा होऊ शकतो याची आकडेवारीच आ.आशुतोष काळे यांना दिली. त्या आकडेवारीनुसार कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात जवळपास ०२ हजार टन युरियाचा पुरवठा होणार आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.यावेळी वितरक कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कोपरगाव तालुक्यात रब्बी हंगाम सुरु असतांना यूरिया खत तुटवड्याबद्दल बैठक आयोजित करण्याची नामुष्की ओढावली असल्याची खंत जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी यावेळी व्यक्त केली.
या बैठकीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, जिल्हा परिषद कृषी विभागाचे सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिल्हा कृषी निरीक्षक राहुल ढगे, कृषी अधिकारी गणेश बिरदवडे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस.डी. कोष्टी, स्पिक-ग्रीनस्टार कंपनीचे प्रतिनिधी गोविंद मुंढे,आर.सी.एफ.चे प्रतिनिधी धनाजीराव देशमुख, इफकोचे प्रतिनिधी वैभव ढेपे,संकेत कराळे, एन.बी.सी.एल.चे संदीप अहिरे, पी.पी.एल.चे सिद्धांत दत्ता, संकेत भोज तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते.

चौकट-कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व सर्व कृषी सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजावून घेतले. ते प्रश्न व अडचणी कृषी विभागाच्या बैठकीत उपस्थित करून संबंधित खत सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्या अडचणीवर तोडगा काढून ते प्रश्न व अडचणी तातडीने सोडवण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी संबंधित खत सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या.

फोटो ओळ- युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींना सूचना करतांना आ.आशुतोष काळे समवेत जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, कृषी विभगाचे अधिकारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *