समुह विकास संकल्पना व जास्त उत्पादन देणार्या वाणांचा अवलंब करून ऊस उत्पादन वाढवावे:- कुलगुरु डॉ. शरद गडाख…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
समुह विकास पध्दतीने एक गाव एक ऊस वाण या संकल्पनेद्वारे ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन वाढविण्यासाठी ऊस संशोधन केंद्रामार्फत प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये शिफारशीत ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सभासद, कृषि विज्ञान केंद्र, प्रगतशील शेतकरी व साखर कारखाने यांच्या शेतावर एकरी 100 टन आद्यरेखीय प्रात्यक्षिके घेवून ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व गणेशखिंड येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर यांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे भेट दिली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. यावेळी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, ऊस शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, अ.भा.स.स.प्रकल्पाचे ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे, ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरवे, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. माधवी शेळके व कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. किरणकुमार ओंबासे उपस्थित होते.


कुलगुरु डॉ. शरद गडाख मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की ऊस उत्पादन तंत्रज्ञानाची शिफारशीत माहिती डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्यांपर्यत पोहचविण्यासाठी 3 मिनिटांचे छोटे व्हीडीओ तयार करून विद्यापीठाद्वारे विकसीत करण्यात येणार्या युट्युुब चॅनलद्वारे प्रसारीत करण्यात यावे. यामुळे विद्यापीठाचे ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान सर्व सामान्यांपर्यंत पोहचेल. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की या ऊस संशोधन केंद्राद्वारे विकसीत वाणाखालील क्षेत्र व ऊस उत्पादन तंत्रज्ञान शिफारशीमुळे राज्यातील सहकारी व खाजगी कारखान्यांना व शेतकर्यांना आर्थिक फायदा झालेला आहे.
डॉ. राजेंद्र भिलारे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या 17 वाणांची माहिती देवून या वाणांचे देशासाठी आणि राज्यासाठी असलेले योगदान याविषयी माहिती दिली. यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागामध्ये चालू असलेल्या तांत्रिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या भेटीदरम्यान कुलगुरुंनी विविध विभागामध्ये चालू असलेल्या तांत्रिक कार्यक्रमांचा आढावा घेतला. प्रक्षेत्रावर संशोधन केंद्राद्वारे विकसित ऊस व सोयाबीन वाणांचे मुलभूत प्लॉट तसेच विविध विभागाच्या ऊस संशोधन प्रयोगांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या भेटी निमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते आंबा व चिंच झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेळी संशोधन केंद्रावर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी केले तर आभार डॉ. किरणकुमार ओंबासे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *