
कोपरगांव प्रतिनिधी:- राज्यात गेल्या एक ते दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने संपुर्ण जनजीवन विस्कळीत केले असतांना आता दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली असून या लाटेमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या किटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे.तपासणी करण्यासाठी गरज असलेल्या अँटीजन किटचा पुरवठा लोकप्रतिनिधींना होत आहे मात्र प्रशासनाकडे शासनाच्या माध्यमातून किट उपलब्ध होत नाही ही अत्यंत खेदाची बाब असून शासनाच्या माध्यमातून कीटची उपलब्धता होण्यास कोणती अडचण आहे,लोकप्रतिनिधी शासनाकडून कीट उपलब्ध होत नाही याची कबुली देऊन शासनाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थित केला आहे.
श्री काले पुढे म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत तीव्र गतीने फोफावत असून या लाटेमुळे रुग्णसंख्येत वाढ तर होतच आहे त्यातच या लाटेने रौद्र रुप धारण केल्यामुळे मृत्यु दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.सद्यस्थितीत नागरिकांना अँटीजन चाचणी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून चाचणी कीट उपलब्ध होणे क्रमप्राप्त आहे परंतू गेल्या आठ दिवसापासून शासनाकडून कीटचा कोणत्याही प्रकारचा पुरवठा झालेला नाही मात्र लोकप्रतिनिधींना चाचणीचे कीट उपलब्ध होतात तर प्रशासनास किट उपलब्ध होत नाही ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.शासनाकडे कीट पुरवठा करण्यासाठीही पुरेसा निधी नाही काय? असाही प्रश्न या निमित्ताने श्री काले यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनासारख्या महामारीने आधीच नागरिक भयभीत झाले असतांना आता चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले कीटही जर लोकप्रतिनिधींना पुरवावे लागतात तर शासन काय करते याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी लागणारे कीट शासनाने तातडीने उपलब्ध करुन द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे जेणेकरुन नागरिकांना जास्तीत जास्त अँटीजन चाचण्या करता येतील.
