

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील कोलपेवाडी, करवडी, माहेगांव देशमुख व काकडी या भागातील प्लॉटला विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये हॉर्टसॅप प्रकल्पाचे प्रमुख तथा वनस्पती रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आण्णासाहेब नवले, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजनेचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे तसेच कृषि विभागातील कोळपेवाडीचे मंडळ कृषि अधिकारी श्री. पांडुरंग जाधव, पोहेगावचे मंडळ कृषि अधिकारी श्री. सुनील घारकर, काकडीचे कृषि सहाय्यक श्री. विशाल साबदे, रांजणगाव देशमुखचे कृषि सहायक श्रीमती तायडे हे उपस्थित होते. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळींब व टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब व टोमॅटो पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन आणि अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकर्यांना डाळिंब व टोमॅटो पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाहणी केल्यानंतर या डाळिंब बागेमध्ये जीवानुजण्य तेल्यारोग, बुरशीजन्य ठिपके या रोग व थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव दिसला. तसेच टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या अनुषंगाने किड एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. भेटीवेळी शेतकर्यांना विद्यापीठामार्फत तयार केलेल्या अडवायसरी देण्यात आल्या. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी हॉर्ट्सप प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे यांचे सहकार्य लाभले.
