आ. आशुतोष काळेंनी रामलल्लाच्या महावस्त्राचा धागा विणण्याची केली सेवा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत असून अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपल्याला देखील कुठेतरी प्रभू श्रीरामाची सेवा करायला मिळावी या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांनी प्रभू श्रीरामासाठी येवला शहरात तयार करण्यात येणाऱ्या महावस्त्राचा धागा विणण्याची सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.१६) रोजी येवला येथील कापसे फाउंडेशनला भेट दिली. या कापसे फाउंडेशनला अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामलल्लाला महावस्त्र तयार करण्याची सेवा मिळाली असून रामलल्लाचे महावस्त्र तयार करण्याचे काम सुरु असतांना आ. आशुतोष काळे यांनी देखील या महावस्त्राचे धागे विणण्याची माहिती घेवून स्वत: देखील या महावस्त्राचा धागा विणण्याची सेवा केली.
कापसे फाउंडेशनचे संस्थापक बाळकृष्ण कापसे यांच्या कापसे फाउंडेशनला रामलल्लासाठी महावस्त्र तयार करण्याची मिळालेली सेवा हि मोठी भाग्याची गोष्ट आहे. मागील ३ महिन्यांपासून कापसे फाउंडेशनमध्ये रामलल्लाचे महावस्त्र तयार करण्याचे काम सुरु असून अनेक श्रीराम भक्तांनी ह्याठिकाणी येऊन धागा विणण्याची सेवा दिली आहे. रामलल्लाच्या वस्त्रात धागा विणण्याची सेवा अर्पण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कापसे फाउंडेशनचे आभार मानले. व या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामलल्लासाठी तयार करण्यात येणाऱ्या वस्त्राचा धागा विणण्याची सेवा मिळाली हे माझे परमभाग्य असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कापसे फाउंडेशनच्या अहिल्यामाता गो-शाळेलाही भेट दिली. कापसे कुटुंबीय कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेली गोसेवा व सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. आपल्या व्यवसायाची घडी बसवून सामाजिक बांधिलकी जोपासतांना कापसे कुटुंबीय आपले सामाजिक उत्तरदायित्व व धार्मिक जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडत असून समाजासाठी त्यांचे आदर्शवत काम असल्याचे गौरवद्गार आ. आशुतोष काळे यांनी यावेळी काढले. याप्रसंगी दिलीपराव खोकले, सौ.दिपाताई खोकले, किशोर कापसे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामलल्लाच्या महावस्त्राचा धागा विणण्याची सेवा करतांना आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *