आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे :- आ.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर – गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वाजे पर्यंत पाटबंधारे विभागाच्या सिंचन शाखा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला लाभधारक शेतकऱ्यांसाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करता येणार आहे. त्यासाठी लाभधारक क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालयात आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज जमा करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतीसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ साठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. नमुना नंबर ७ अर्जाच्या मागणीनुसार सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी हंगामी भुसार पिके, फळबागा तसेच बारमाही उभ्या पिकांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे.

लाभक्षेत्रातील हंगामी भुसार पिके, फळबागा व बारमाही उभ्या पिकांना रब्बी हंगामाच्या अखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मंजूर क्षेत्रात उभ्या पिकांना पाणी घेटांना काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. रब्बी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज वेळेत दाखल करावेत जेणेकरून पाटबंधारे विभागाला लाभधारक शेतकऱ्यांसाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करता येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्ह्टले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *