
कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोपरगाव येथील साई संजीवनी सहकारी बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन (एमयूसीबीएफ) लि., मुंबई यांच्या वतीने सन २०२३ या वर्षासाठी नाशिक विभागात १०० कोटी रुपयांच्या गटातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन शनिवारी (३० सप्टेंबर) गौरविण्यात आले. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या मुंबईत झालेल्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा व उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष व युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, साई संजीवनी सहकारी बँकेचे संचालक जयंतीभाई पटेल, संभाजीराव रक्ताटे, गोरख आहेर, बापूसाहेब बारहाते, तज्ज्ञ संचालक ॲड. अशोकराव टुपके, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर सभारंजक आदींसह महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी स्थापन केलेल्या साई संजीवनी सहकारी बँकेला गेल्या सात वर्षांपासून बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातत्याने पुरस्कार मिळत आहे. साई संजीवनी सहकारी बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेचे अनुत्पादित मालमत्ता (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे एनपीए), भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीआरएआर), नफा, ठेवी, कर्ज आदी वेगवेगळे आर्थिक निकष पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरीची परंपरा अबाधित ठेवली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा व उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे यांनी बँकेचे तरुण व अभ्यासू अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे तसेच संचालक मंडळ व व्यवस्थापनाचे यावेळी विशेष अभिनंदन केले.
साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या कुशल नेतृत्वाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून, या बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात अनेक नवे मानदंड प्रस्थापित करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. साई संजीवनी बँकेस गतवर्षी दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरावर युनिट बँका व १०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँक गटातील राज्य पातळीवरील द्वितीय पुरस्कार मिळाला होता. तसेच दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने ९ सप्टेंबर २०२३ रोजी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या हस्ते पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार देऊन या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे. आता महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त झाल्याने साई संजीवनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी बँकेचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, आजी-माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार बँकेचे संस्थापक माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, सर्व सभासद व ठेवीदार यांना समर्पित करत असल्याचे सांगून साई संजीवनी बँकेचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी कोपरगाव तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे उभारले. कोपरगावात साई संजीवनी को-ऑपरेटिव्ह बँक स्थापन करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांचे जीवन समृद्ध केले. त्याचबरोबर बँकेच्या माध्यमातून गरजवंतांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन ग्रामीण अर्थकारण मजबूत केले व बँकेला प्रगतीच्या शिखराकडे नेले. स्व. कोल्हेसाहेब यांच्या विचार जपत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. बँकेचे तसेच सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचे हित जपत बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक बनविण्यासाठी आपण कायम प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.
