
कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तयारी स्पर्धा परीक्षांची’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील ख्यातनाम मार्गदर्शक, राजमुद्रा अकॅडमी पुणे चे संचालक मा.श्री.मनोहर भोळे सर तसेच आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे संचालक मा.श्री.पंकज माळी सर हे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात मा. मनोहर भोळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात अतिशय सखोल व तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अभ्यासासाठी जागा, चांगली पुस्तके, योग्य मार्गदर्शन आणि इच्छाशक्ती या चतुसूत्रीचा वापर केल्यास विद्यार्थी सहज अधिकारी होऊ शकतो असे नमूद केले. आपल्या आयुष्यात आपण यश संपादन केले तर सर्वात जास्त आनंद आपल्या आई-वडिलांना होतो आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यासाठी तुम्ही तुमचे आयुष्य यशस्वी होण्यासाठी घडविले पाहिजे. स्वप्न मोठी पहा आणि ती सत्यात उतरविण्यासाठी मेहनत करा. यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांची असंख्य उदाहरणे त्यांनी याप्रसंगी दिली.
दुसऱ्या सत्रात मा. पंकज माळी सर यांनी वेळेचे महत्व विशद करतांना स्पर्धा परीक्षा ही अडथळ्यांची स्पर्धा आहे. ती पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास हा एकच पर्याय आहे. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही असा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे नमूद केले. महाविद्यालयात असलेल्या सुसज्ज ग्रंथालय, व इतर सुविधांचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा व अधिकारी होऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या विभागाचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके यांनी स्पर्धा परीक्षा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रमांची माहिती विशद करून अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव यांनी तर आभार प्रो.(डॉ.) विजय ठाणगे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी डॉ. गणेश देशमुख, डॉ. संजय दवंगे यांच्यासह अनेक प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
