
आत्मा मलिक मध्ये ‘जात व जातवैधता प्रमाणपत्र’ मार्गदर्शन शिबिर संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- ऐरवी जातवैधता प्रमाणपत्र
इयत्ता १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. अहमदनगर जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांना
जात वैधता प्रमाणपत्र वाटपाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा समितीच्या या उपक्रमांचा लाभ महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी
घ्यावा. असे आवाहन अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी
भागवत खरे यांनी आज येथे केले.
अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कोकमठाण येथील
आत्मा मलिक कनिष्ठ महाविद्यालयात मंडणगड पॅटर्न अंतर्गत ‘जात व जातवैधता
प्रमाणपत्राबाबत’ मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी श्री.खरे बोलत
होते. यावेळी आत्मा मलिकचे व्यवस्थापक सुर्यभान मलिक, प्राचार्य नामदेव
डांगे, विभाग प्रमुख प्रविण उगले, शिवाजी शिरसाठ, संग्राम गोपाळे आदी
उपस्थित होते.
श्री.खरे म्हणाले की, मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा,
निवडणूक व इतर संविधानिक लाभ आरक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करून घेताना
जात व जातवैधता प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अनेकदा
मागासवर्गीय व्यक्तीस विहित कालावधीत प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना
संविधानिक अधिकारापासून वंचित राहावे लागते. शिक्षण हक्क अधिनियम २००९
नुसार शालेय प्रवेशासाठी तसेच पुढील विविध लाभांसाठी जात व जातवैधता
प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे.

सध्या जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन दिले जात असल्यामुळे ही
प्रक्रिया सुलभ झाली आहे. समितीचे अध्यक्ष, उपायुक्त व संशोधन अधिकारी हे
विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांची ऑनलाईन छाननी करतात. त्यानंतर त्यांना
जातीविषयी खात्री झाल्यानंतर त्यांना उपायुक्तांच्या स्वाक्षरीने ऑनलाईन
प्रमाणपत्र देण्यात येते. आत्मा मलिक मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांत
शिकणाऱ्या १४८ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येत्या काळात
स्विकारण्यात येऊन त्यातील जातीचा दावा सिध्द केलेल्या विद्यार्थ्यांना
शिबिरांच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल. असे श्री.खरे
यांनी यावेळी सांगितले.
‘जात व जातवैधता प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करावा व
त्यासाठी कोणते दस्ताऐवज जोडावेत, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे
आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत श्री.खरे यांनी सोप्या भाषेत
विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.
