कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- महावितरण ने शेतकऱ्यांना वीजबिल भरण्या संदर्भात दिलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतांशी शेतकरी तयार असून महावितरण शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना केल्या आहेत.
महावितरणने शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीबाबत ताठर भूमिका घेवून रोहीत्रांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या घेतलेल्या धोरणाबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची भेट घेतली. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेतीपंपाच्या वीज बिल वसुली करतांना महावितरण कडून वीज रोहित्र बंद करण्यात येत आहे. सध्या गहू, कांदे, मका, आदी पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून वीज रोहित्र बंद करून वीज पुरवठा खंडित केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या निदर्शनास आणून दिले.
मागील काही वर्षापासून शेतकरी अडचणीत असून मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात असली तरी महावितरणने शेतकऱ्यांना विश्वासात घेवून त्यांना योजना समजावून सांगावी. अनेक शेतकरी या योजनांचा लाभ घेणार आहेत. महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थकीत वीजबिल भरण्यासाठी समुपदेशन करून शेतकऱ्यांची मानसिकता तयार करावी शेतकऱ्यांना थोडासा अवधी द्यावा. थकीत रक्कमेचे काही हफ्ते करून द्या. वीज बिल वसुलीसाठी वीज रोहित्र बंद करण्याची कार्यवाही न करता अखंडपणे वीज प्रवाह सुरु ठेवावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना केल्या आहेत.

फोटो ओळ:- महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्याशी चर्चा करतांना आमदार आशुतोष काळे.
