वारीत रंगला बालगोपाळ वारकऱ्यांचा रिंगण सोहळा ; आषाढी एकादशी : जिल्हा परिषद शाळेत दिंडी उत्साहात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दुसऱ्या आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळाचा दिंडी सोहळा शनिवारी (दि.२३) सकाळी ८ ते ११ यावेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिंडी सोहळ्यातील बालगोपाळ वारकऱ्यांचा शाळेच्या प्रांगणातील रिंगण सोहळा विशेष आकर्षण ठरला.
पंधरा दिवसापूर्वीच्या पहिल्या आषाढी एकादशीला पाऊस असल्याने या शाळेतील बालगोपाळ विधार्थ्यांना दिंडी सोहळा साजरा करता आला नव्हता. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला होता. त्यावर शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी बैठक घेत विधार्थ्याना दिंडी सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी दुसऱ्या आषाढी एकादशीला हा दिंडी सोहळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिंडी सोहळा पार पडला.
या दिंडी सोहळ्यात २०० पेक्षा जास्त बालगोपाळ वारकरी विधार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी विध्यार्थ्यासाठी दोन पालख्या सजविण्यात आल्या होत्या. एका पालखीत पुस्तक तर दुसऱ्या पालखीत झाडाचे छोटेसे रोपटे ठेवण्यात आले होते. तसेच चार विद्यार्थ्यानी विठ्ठल – रखुमाई यांची तर उर्वरित विद्यार्थांनी वारकऱ्यांची वेषभूषा धारण केली होती. यावेळी सजवलेल्या पालख्या, झेंडेकरी, डोक्यावर तुळस घेऊन विद्यार्थिनी, लेझीम, ढोल, टाळांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेपासून प्रस्थान होऊन संपूर्ण गावातून हा दिंडी सोहळा मिरविण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विठ्ठल – रखुमाई यांच्यासह बालगोपाळ वारकऱ्यांचे पूजन केले. तसेच खाऊ दिला. यावेळी बालगोपाळांनी तसेच पालकांनी फुगडी खेळत दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. दिंडी सोहळा पुन्हा शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर भव्य रिंगणाने भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या नामघोषात आसमंत दुमदुमुन गेला होता. याप्रसंगी बालगोपाळ वारकऱ्यांना खाऊ तसेच महाप्रसादाचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे या शिक्षकासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते.

फोटोओळी:-
वारीतील जिल्हा परिषद शाळेतील बालगोपाळ वारकऱ्यांचा रिंगण सोहळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *