
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव-सावळीविहीर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले होते. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून व सातत्याच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीस लवकरच तांत्रिक मान्यता मिळून या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असा आशावाद श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सावळीविहीर फाटा ते कोपरगाव तालुका हद्द या ९ किलोमीटरच्या मार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. शेजारीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान असल्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत ना. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेवून या मार्गासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्याबाबत ना.गडकरी यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादातून या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाली आहे. प्राथमिक स्वरूपातील तांत्रिक मान्यतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय मान्यता मिळविल्या आहे. १९ एप्रिल रोजी त्याबाबत १७८ कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी तांत्रिक मंजूरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्रालय स्तरावर लवकरच मान्यता मिळणार असून अंतरिम मान्यता मिळताच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे वेळोवेळी मोठे सहकार्य व मदत मिळाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
