येवला तालुका पोलीस स्टेशन इमारतीचे लोकार्पण; गुन्हेच घडू नयेत यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा:-पालकमंत्री छगन भुजबळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा,
असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज येवला प्रशासकीय संकुल येथे येवला तालुका पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, समरसिंग साळवे, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता शरद राजभोर, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी,तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, श्री. राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, आंबदास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक श्री. ससकर, जिल्हापरिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, वसंत पवार, दीपक लोणारी, सचिन कळमकर, ज्ञानेश्वर शेवाळे,सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे आदी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा शेतीव्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारी वर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहे

अद्यापही प्रशासकीय संकुलात अजून विविध विकासकामे करायची आहेत. देशाला मॉडेल ठरेल अशी ही वास्तू निर्माण केली. त्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. येवला प्रशासकीय संकुल हे देशातील शासकीय वास्तंमधील रोड मॉडेल आहे. त्यामुळे या ही वास्तू चांगली ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

येवला तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची ३० कोटी ९२ रुपयांची कामे आणि विंचूर लासलगाव सुमारे १७ कोटी असे एकूण ४८ लक्ष ४२ लक्ष रुपयांची कामे निविदा स्तरावर आहेत. तसेच नाशिक येवला रस्ता यासह विविध कामे निविदा स्तरावर असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडून विजयी आणि पराभूत झालेल्या सर्वांनी एकत्र येऊन गावांचा विकास साधावा या संकुलात आजपर्यंत उपविभागीय अधिकारी(प्रांत) कार्यालय, तालुकास्तरीय प्रशासकिय इमारत (तहसिल कार्यालय), पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद इमारत, फलोत्पादन अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय सा.बां.विभाग कार्यालय, दुकान निरीक्षक कार्यालय, रेशीम उद्योग कार्यालय, बहुउद्देशिय हॉल इ . इमारती पूर्ण झालेल्या असून कार्यान्वयीत झालेल्या आहेत. त्यात पोलीस स्टेशनचा समावेश झाला असून राहिलेली कामे लवकरच पूर्ण केले जातील, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकास कामे थांबली होती. मात्र येवला मतदारसंघात विकासकामे अविरत सुरू राहिले हे विशेष आहे. कोरोनाच्या काळात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अतिशय सुयोग्य नियोजन केले. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी येवल्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये एकठिकाणी आणून राज्यात आदर्श प्रशासकीय संकुलाचे एक मॉडेल तयार करून दिले असल्याचे त्यानी सांगितले.

यावेळी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर म्हणाले की, या वास्तुतून शोषित पीडित समाजाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. येवला ही स्वर्गीय तात्याटोपे यांची नगरी आहे. ब्रिटिशांशी लढताना येवल्याची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिसांची भूमिका ही शोषित पीडित समाजाला न्याय देण्याची असली पाहिजे असे आवाहन करत पोलीस स्टेशन हे न्याय मंदिर बनवून ब्रिटिश मानसिकतेतुन बाहेर पडावे असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, प्रशासकीय संकुल बघितल्यावर मिनी मंत्रालयाची आठवण येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नाशिक मध्ये छगन भुजबळ यांनी चांगला विकास केला आहे. त्यांच्यासारखे पालकत्व मिळाले हे आपले भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अधीक्षक अभियंता शरद राजभोर यांनी केले. आभार अनिल भवारी यांनी मानले.

अशी आहे येवला तालुका पोलीस स्टेशन इमारत

येवला शहरात विखुरलेल्या स्वरुपात अडगळीच्या ठिकाणी व अपूऱ्या जागेत तालुका पोलीस स्टेशन कार्यान्वित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी या प्रशाकीय संकुलात तालुका पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे.

सदर इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १ कोटी ३३ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. या इमारतीचे सर्वसाधारण चटई क्षेत्रफळ – ४२५० चौ.फुट इतके आहे. यामध्ये मुख्य पोलिस स्टेशन इमारतीमध्ये तपासणी अधिकारी कक्ष, महिला कॉन्स्टेबल कक्ष, एस.एच.ओ.कक्ष, सशस्त्र खोली, पुरुष व महिला लॉकअप, प्रसाधन गृह, तपासणी कक्ष, संगणक कक्ष , रेकॉर्ड रुम, दिव्यांगासाठीचा रॅम्प तसेच इतर सोयीसुविधा असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *