
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असतांना सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज नवनवीन शोध लागत आहे. आज प्रत्येक क्षेत्र डिजिटल होत असून बँकिंग क्षेत्र देखील त्यास अपवाद नाही. हे ओळखून महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकेमध्ये अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागाची कामधेनु म्हणून आपली वेगळी ओळख जपणाऱ्या गौतम सहकारी बँकेने माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँक प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतांना बॅंकेने स्वतः चे संकेतस्थळ (वेबसाईट) सुरु केले असून या संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासावर प्रतिकूल परिस्थितीत फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुडभरारी घेणारी गौतम सहकारी बँक काळाची गरज ओळखून आपली वाटचाल करीत आहे. या वाटचालीत आधुनिक तंत्रज्ञानाची भर घालून माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकतांना बँकेचा इतिहास व वाटचालीची माहिती देणारे www.gautambank.com या नावाने संकेतस्थळ अर्थात वेबसाईट सुरु केले आहे. शुक्रवार (दि.२२) रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोसाका उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकरी संस्था उभ्या केल्या व अनावश्यक खर्च टाळून या संस्था काटकसरीने कशा चालविल्या पाहिजे याचा आदर्श समोर ठेवला. माजी आमदार अशोक दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँकेचे व्यवस्थापन मंडळ नेत्रदीपक प्रगती करीत आहे.
कोविड १९ सारख्या जागतिक महामारी आजारामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करीत बँक उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. बँकेस दि.३१ मार्च २०२० अखेर १ कोटी ३९ लाखांचा नफा झाला. चालू वर्षात देखील बँकेस भरीव नफा होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठेवीत वाढ करून गरजू जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण कराव्या, चांगले कर्जवाटप करावे, विना सक्तीची कर्ज वसुली करावी, सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून बँकेचे कामकाज करावे असा सल्ला दिला. बँकेने आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे माध्यमातून राज्यात अव्वल स्थान ठेवून गरीब व होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुटीर व लघुव्यावसायिक तसेच शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी चांगल्या प्रकारचे कर्ज वाटप केलेले आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.आधुनिक तंत्रज्ञानामुळे सिक्युअर वेब पोर्टलवर बँकेच्या कामकाजाची सर्व पारदर्शक माहिती घरबसल्या बँकेच्या वेबसाईट वरून पाहता येणार आहे. त्यामुळे बँकेची भक्कम असलेली आर्थिकस्थिती पाहून जास्तीत जास्त बँक ग्राहकांनी बँकेत नियमित व्यवहार ठेवावेत असे आवाहन केले.याप्रसंगी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड, सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ- गौतम सहकारी बँकेच्या संकेतस्थळ (वेबसाईट)चे उद्घाटन करतांना आमदार आशुतोष काळे समवेत चेअरमन बाबासाहेब कोते, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड आदी.
