

कोपरगाव प्रतिनिधी:-
निवारा मित्रमंडळ ट्रस्ट संचलित श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने निवारा, सुभद्रानगर, कोजागिरी कॉलनी, ओमनगर, द्वारकानगरी, जानकीविश्व, रिद्धीसिद्धी नगर, आढाव वस्ती, शंकरनगर, आदि परिसरातील जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक व महिलांसाठी तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ ५ फेब्रुवारी २०२१ रोजी निवारा परिसरातील महादेव मंदिरा समोरील प्रांगणात उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.
प्रसंगी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्यावतीने कोरोनामुळे खंडित झालेले विवीध उपक्रम पुनः नव्या जोमाने सुरु करण्यात आले. विशेषत: निवाऱ्यातील कै.आसाराम पाटील आढाव उद्यानात प्रत्येक श्रेष्ठ-जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा केला जात असे पण कोरोनामुळे हा उपक्रम खंडित झाला.

या दरम्यान जेवढ्या जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांचा वाढदिवस होऊन गेला, त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या नगरसेविका सौ.दीपाताई गिरमे, श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या मार्गदर्शिका सौ.सुहासिनीताई कोयटे, अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, सौ.कर्डकताई, तसेच मित्रमंडळाचे इतर पदाधिकारी आदींच्या हस्ते करण्यात आला. हळदी-कुंकूवासाठी उपस्थित असलेल्या जेष्ठ-श्रेष्ठ महिलांना वाण म्हणुन समता महिला बचत गटाने तयार केलेल्या अगरबत्तीचा पुडा व तिळगुळ देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना काका कोयटे म्हणाले कि,‘जेष्ठ श्रेष्ठ नागरिक हा भारतीय संस्कृती आणि परिवाराचा कणा आहे. त्यांच्यामुळे आज भारतीय संस्कार, संस्कृती टिकून आहे. त्यांचा आदर करणे प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. जेष्ठ नागरिकांनी देखील घरात लक्ष देतांना योग्य ती काळजी घ्यावी आणि जिथे गरज पडेल तिथेच मार्गदर्शन करावे. जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने देखील भक्कम कायदे करून चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा सुकर मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा’.
तसेच ते पुढे म्हणाले कि,‘ प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक श्री.जनार्दन कदम व नगरसेविका सौ.दिपा गिरमे हे सर्वोत्कृष्ट नगर सेवक असून त्यांचा श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे उपक्रमांना नेहमीच पाठींबा असतो. नगर मित्रमंडळाच्या वतीने जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांसाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवुन त्यांची मानसिक व शारीरिकदृष्ट्या काळजी घेत आहोत. निवारा परिसरातील प्रत्येक जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकाची काळजी घेणे हि श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाची जबाबदारी असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत, जेष्ठांनी देखील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे’.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार यांनी केले, कार्याध्यक्ष श्री. विष्णुपंत गायकवाड, श्री. सुभाष उराडे, श्री.राजेंद्र पाटणकर, सौ.मंगला बुचके, आदि जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांनी कोरोना काळात आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त करत मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांचे स्वागत केले.
श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेविका सौ.दिपाताई गिरमे यांच्याकडे श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या व उपस्थित जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांच्या वतीने निवारातील महादेव मंदिरा जवळील गणेश स्टेज समोरील प्रांगणात आणि कै.आसाराम पाटील आढाव उद्यानात पेविंग ब्लॉक लवकरात लवकर बसवुन देण्यात यावेत. अन्यथा शहरातील सर्व जेष्ठ-श्रेष्ठ मित्र मंडळाचे सदस्यांचेवतीने कोपरगाव नगरपालिकेसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. मनोगत व्यक्त करताना नगरसेविका सौ.दिपा गिरमे म्हणाल्या कि,‘श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कोपरगावातील जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांची मानसिक शारीरिकदृष्ट्या विविध उपक्रम राबवुन काळजी घेत असतात. त्यासाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू आणि एका महिन्यात निवारा परिसरातील गणेश स्टेज समोरील प्रांगणात व कै. आसाराम पाटील आढाव उद्यानात पेविंग ब्लॉक बसवुन देवु.
कार्यक्रमाला समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, प्रभाग क्र.२ मधील नगरसेविका सौ.दिपाताई गिरमे, निवारा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री वैभव गिरमे, समता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, सौ.कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवारा परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील सर्व जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार समता वार्ता मासिकाचे सहसंपादक पोपट साळवे यांनी मानले.
