
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगेसचा झेंडा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असले तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा परिषद गटवार दौरा सुरु करण्यात आला आहे. बागलाण तालुक्यातील विरगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक वनोली या गावात संपन्न झाली. त्या प्रसंगी अॅड. रविंद्रनाना पगार बोलत होते. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, जेष्ठ नेते सर्वश्री केदा बापु भामरे, किशोर खैरनार, वसंत भामरे, गौरव निकम, शरद भामरे, संजय भामरे, किरण पाटील, मुरलीधर खैरनार, बापू पाटील, पंडितराव वानखेडे, संजय पवार, अरुण भामरे आदींची भाषणे झाली.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सहा आमदार असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठया भावाच्या भूमिकेत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रित लढविण्यात येणार आहे. परंतु काही कारणास्तव आघाडी न झाल्यास येणाऱ्या आगामी निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा सक्षम उमेदवार तयार ठेवावा लागेल असेही जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी सांगितले.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक थेट शेतकरी वर्गाशी संबंधित व ग्रामीण भागाची निवडणूक असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सत्ता खेचून आणण्याचा निर्धार माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशोर खैरनार यांनी प्रास्ताविक केले तर पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांनी सूत्रसंचलन केले.

फोटो ओळी:- विरगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार समवेत माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, केदा बापु भामरे, किशोर खैरनार, वसंत भामरे आदी दिसत आहेत.
