नाते शब्दांचे साहित्य मंच हा भविष्यातील शीतलता देणारा वटवृक्ष:- साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- रविवार दि.१० एप्रिल २०२२ रोजी संतांची पवित्र भूमी म्हणून ओळख असणाऱ्या कोपरगाव शहरात ‘ नाते शब्दांचे साहित्य मंच ‘ या समूहाने आयोजित केलेले दुसरे राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक श्री चंद्रकांतदादा वानखेडे ( पुणे) तर उद्घाटक म्हणून कोपरगाव तालुक्याचे मा.नगराध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक श्री विजयराव वहाडणे सो.उपस्थित होते, तर कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अहमदनगरचे संचालक श्री विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे, महानंदा दुधसंघाचे मा.उपाध्यक्ष श्री राजेंद्रबापू जाधव व कोपरगाव शहरीचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले साहेब आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अहमदनगर मराठा उद्योजक लॉबीचे जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, अहमदनगर मराठा उद्योजक लॉबीचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुल आढाव व संस्थापक उपाध्यक्ष मराठा विकास फाऊंडेशन कोपरगावचे संतोष पेकले हेही आवर्जून उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती वनमाला पाटील, जेष्ठ गझलकार श्री राम गायकवाड व सुप्रसिद्ध चित्रकार श्री अरविंद शेलार हे ही व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
संमेलनास ८:०० वा. राज्यभरातून आलेल्या कवींची नाव नोंदणी व चहापानाने सुरुवात होऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन संपन्न झाले. त्यानंतर आपल्या समूहाची होत असलेली वाटचाल, समूहाचा लेखाजोखा, संमेलन ठेवण्याचा उद्देश व भविष्यातील समूहाच्या माध्यमातून राबविण्याच्या नियोजित संकल्पना आपल्या प्रास्ताविकात नाते शब्दांचे साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार आयोजक समितीच्या वतीने करण्यात आला. कवयित्री सौ.चंदन तरवडे यांच्या चंदनकाव्य, कवी श्रीशैल सुतार यांच्या हरवलेलं घर, कवयित्री सौ. सीमाराणी बागुल यांच्या जीवनाची शाळा आणि कवयित्री सौ. वनमाला पाटील यांच्या भगवतगीता जशी शे तशी या काव्यसंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
तालुक्यात सुरू असलेल्या ‘ नाते शब्दांचे साहित्य मंच’ च्या माध्यमातून सुरू असलेल्या साहित्यिक कार्याचे तोंडभरून कौतुक करून, संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे व मोठ्या भव्यदिव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्याचे व संपूर्ण संमेलनाची चित्रफीत आपल्याला देण्याचे आवाहन प्रमुख अतिथी मा.श्री विवेकभैय्या यांनी आपल्या मनोगतात केले. खाकी वर्दीच्या आतला रसिकश्रोता पोलीस निरीक्षक मा.वासुदेव देसले साहेब यांनी सादर केलेल्या सुरेश भट साहेबांच्या रचनेने व त्यांच्या साहित्यावरील अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यांच्या मनोगतातून उपस्थितांनी अनुभवले. आपल्या मिश्किल चारोळ्यानी व वात्रटिकांमधून रसिकांना खिळवून ठेवून खेळीमेळीचे वातावरण उद्घाटक मा.नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी निर्माण करून आपले साहित्यिक विचार आपल्या मनोगतातून मांडले. कवयित्री श्रीमती वनमाला पाटील, गझलकार श्री राम गायकवाड, चित्रकार अरविंद शेलार यांनी आपापल्या बहारदार रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अध्यक्षीय भाषणात जेष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे यांनी आपली माय कविता सादर करून सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला. आपल्या पहाडी आवाजाने, समर्पक शब्दफेकीने आणि अभ्यासू मार्गदर्शनाने, वक्तृत्वाने अध्यक्ष पदाची शोभा अधिक उंचीवर नेवून संमेलनास मोठा दर्जा प्राप्त करून दिला.
संमेलनास आलेल्या सर्वांनी सुग्रास मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेतला. कोपरगाव तालुक्यासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७० कवी कवयित्रीनी संमेलनास हजेरी लावून आपापल्या बहारदार रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. संमेलन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण दिवसभर सुरू होते. संमेलनाची रंगत वाढविण्यात उत्कृष्ट निवेदक अमोल चिने यांनी मोलाची भूमिका बजावून त्यांस निवेदिका सौ.चंदन तरवडे व निवेदक श्री नंदकिशोर लांडगे यांच्या शब्दांच्या तितक्याच ताकदीने साथ देवून सर्वांवर आपली छाप उमटवली. संमेलनाची सांगता सर्व साहित्यिकांना व उपस्थितींना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
काव्यसंमेलन यशस्वीतेसाठी आयोजक समितीतील कवी श्री बाळासाहेब देवकर, कवी डॉ.श्री जी.के.ढमाले, कवयित्री सौ.चंदन तरवडे, कवयित्री सौ.सुनिता इंगळे, कवी श्री पंडित निंबाळकर, कवयित्री सौ आरती कोरडकर, कवी श्री विलास नवसागरे, कवी श्री दीपक सोनवणे, कवी श्री नंदकिशोर लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *