सेवा फाउंडेशनचे रक्तदान शिबीर प्रेरणादायी:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथी उपक्रमानिमीत्त सामाजिक कार्यक्रम सर्वत्र साजरे होत असतात परंतु सेवा फाउंडेशन गेल्या तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करते हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. रक्तदान हे जीवनदान आहे. सीमेवरील जवानांपासून ते घरातील रूग्णापर्यंत सर्वानाच रक्ताची गरज भासत असते तेव्हा प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत येथील सेवा फाउंडेशनच्यावतींने सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी जुनेद शेख यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, पराग संधान, विजय आढाव, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, बाळासाहेब नरोडे, आरिफ कुरेशी अल्ताफ कुरेशी, रिपाईचे दिपक गायकवाड, हाफिज शेख, ईरफान तांबोळी, फिरोज पठाण, मतीन चोपदार, नवाज कुरेशी, असिफ मनियार, युसुफ पठान, फकीरमोहम्मद पहिलवान यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, महापुरूषांचे विचार हा आपला अमुलाग्र ठेवा आहे. या विचाराच्या प्रभावातुन युवक युवतींसह अनेकांच्या जीवनाला आकार मिळत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघटन कौशल्यातुन मावळयांची मोठी फौज उभी केली आणि त्यातुन स्वराज्य घडविले, विचारांची दिशा उभी केली. सेवा फाउंडेशन या थोर पुरुषाची जयंती रक्तदान उपक्रम घेवुन साजरी करते ही बाब सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.
अध्यक्षपदावरून बोलतांना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले म्हणाले की, सामाजिक संघटना हया समाज मनाचे प्रतिबिंब असतात. रक्तदान हे पुण्यदान आहे, त्याची सर्वांनाच आवश्यकता भासत असते. सेवा फाउंडेशनने रक्तदानाचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त तुम्हां आम्हां पर्यंत पोहोचविले आहे. यावेळी भूमिपुत्र फाऊंडेशन व लेब्बैंक सोशल फाऊंडेशनच्यावतीने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष वाटप करण्यांत आले.

फोटोओळी:-
सेवा फाउंडेशनच्यावतीने शिवजयंती निमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व सेवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *