
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिराईत गांवची जमीन ,ईनमिन तिन चारशे लोकायचं गांव आमचं,कोपरगांव पासून लईत लई दोन मैलावर,…आप्पामामा गांवचे सरपंच,आप्पा गांवासाठी होते,..पण माझे मामा होते ते,….चार वर्षापुर्वी सिन्नरला साडूच्या मुलाच्या लग्नाला जात असतानी अपघात झाला आणि मामा जागेवर ठार झाले पण मामी वाचली आणि तीची वाचाचं आजपर्यंत गेली,वाड्याच्या खिडकीतून पलंगावरूनच ती ईठ्ठलाच्या मंदिराला लावलेल्या चार वर्षापासूनच्या कवडाकडं एकसारखी बघत असायची,…कदाचीत कवडाला लावलेल्या कुलपाची चावी कधीतरी मामा घेवून येईल आणि कोंडलेल्या ईठ्ठलाला मोकळं करीन,…कारण अपघातानंतर तीन वर्षतर मामी कोम्यातच होती,एकवर्षापासून डोळे उघडून किमान चहाचा कप धरायला लागली होती,..डाॅक्टरांनी सांगितल्या प्रमाणं होत होतं,..म्हणजे आता काही महीन्यातच मामी बोलायला लागेल,…सगळ्यांना आतुरता लागली होती ती मामीचा आवाज एैकण्याची,ती या पिडेतून बाहेर यायची..,तीच्या दोन्ही मुली मोठ्या वर्गात होत्या,…पोरी बिचा-या आपली माय केंव्हा बोलन,..तिचा पती आता या जगात नाही हे कधी तिला समजल,…याची वाट त्या पाहत होत्या,..सगळेच कामातून वेळ काढून जाता-येता मामीकडे डोकून पाहत,….पण मी मामाचा लाडका भाचा होतो,त्यामुळे मामीनीही खुप जीव मला लावलेला होता,…मी मामीच्या उशाला बसलो पण मामीची नजर त्या कवाडावरचं होती ,…मी तिच्याकडे पाहीले,अपघाता नंतर पहील्यांदा मामीनं मंदिराचं कवाड आणि चहाचा कप सोडून पहील्यांदा चेह-याकडे पाहीले होते आणि तो नशिबवान मी होतो,.." मामी काय वाटतं,.. बरं वाटतं ना आता " असं मी विचारलं आणि मामीचे डोळे भरून आले ,.आणि चमत्कार झाला चक्क मामी पुटपुटली" यांना किती लागलं,डिक्कितलं पाकीट कुठं आहे,." .मला काही वेळ उमजलं नाही,पण सगळे जमले होते ,आनंदी झाले होते,.पण मी विचारात पडलो,डिक्की-पाकीट-यांना बरं आहे का.?,.हे मामी काय बरळत होत्या,काही समजलं नव्हतं,आणि तितक्यात माझी ट्युब पेटली ,..नक्की अपघात आणि गाडी,गाडीची डिक्की.,म्हणजे मामीला नेमकं काय म्हणायचं ते, मी लगेच सर्वातून बाहेर येत बाईकला सेल मारला आणि सिन्नर रोड धरला,.अपघात स्थळी पोहचलो,चार वर्षात गाडीचा सांगडाच शिल्लक ठेवला होता रोडच्या चोरांनी,.बाईक मी साईडला लावली,सांगड्याजवळ पोहचलो,आणि सांगाड्यात जमा झालेलं जाळं बाजुला सारत डिक्की खोलली,.बरंतर रोडच्या चोरांनी डिक्कीतरी पहायची सोडली होती,.डिक्कीत पाकीट जसेच्या तसे होते,.मी ते पाकीट घेवून बाईकला टांगलेल्या पिशवीत टाकले,.आणि घरी आलो,.पलंगावर उठून बसलेल्या मामीच्या हातात ते पाकीट दिले आणि मामी ढसढसा रडायला लागली,…मामीनं स्वताहाच्या हातानं पाकीट फाडलं त्यातून दोन लाख रूपये ,मंगळसुत्र पलंगाच्या गादीवर पडले,.मला वाटलं पैशासाठी,मंगळसुत्रासाठी मामीचा तरफडा चालला होता की काय पण नाही मामी त्या पाकीटात,पैशात ,मंगळसुत्रात अजून काहीतरी शोधत होती ,आणि शेवटी तिला ती शोधत असेलेली वस्तु सापडली ,..ती वस्तु होती ईठ्ठलाच्या मंदिराला कवाड लावलेल्या कुलपाची चावी,.चावी मिळाली आणि मामीला तरतरी आली,ती पलंगाहून थेट ईठ्ठलाच्या भेटीला मंदिराच्या दिशेनं निघाली,मंदिराजवळ पोहचली आम्ही सगळे मामीच्या सोबत चालत गेलो,मामीनी कुलूप उघडलं,कवाड खोलली आणि दरवाजा आम्ही सर्वांनी उघडला.समोरचार वर्षापासून लागलेल्या जाळ्यात ईठ्ठल मकडत उभा होता,कारण आप्पामामाच रोजची ईठ्ठलाची पुजा-अर्चा करीत आणि चावी स्वताहाकडं ठेवत…,ईठ्ठलाला डोळे भरून पाहत मामीनं पाय धरले आणि ""ईठ्ठला"" अशी किंकाळी देत जीव सोडला,
आणि या जिरायती गावच्या जमिनीत आमचे सर्वांचे हा प्रकार पाहून पायचं चिखलात खोलवर रूतल्यागत झाले,बागायती भागात जसा धो धो पाऊस पडतो तसे डोळ्यातून अश्रू वाहू लागले,. मामा-मामीचे एकमेकांवरचे प्रेम आणि दोघांची ईठ्ठलावरची श्रध्दा पाहून मी यांचा भाचा असल्याचा आनंद अश्रूही मी आवरू शकलो नाही..
विठ्ठल विठ्ठल.
कथा काल्पनिक आहे..
भरत मोरे
९५५२२२५५२८
