उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले उत्तर प्रदेशाच्या अधिकाऱ्यांना निवडणूकींचे धडे..!!

कोपरगाव

महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-
(शिर्डी):- नाशिक विभागीय आयुक्तालयात ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर कार्यरत असलेल्या अरुण आनंदकर यांनी 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लखनऊ येथे प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे दिले. भारत निवडणूक आयोगाने त्यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदे, नियम व कार्यपद्धती याबाबत त्यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


प्रशिक्षणासाठी भारत निवडणूक आयोगाने नेमलेल्या देशभरातील एकूण 9 अधिकाऱ्यांपैकी अरूण आनंदकर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत. 27 ते 30 डिसेंबर, 2021 या कालावधीत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे सदर प्रशिक्षण पार पडले. ऑगस्ट – सप्टेंबर 2021 मध्ये गोरखपूर येथे झालेल्या उत्तर प्रदेशातील पूर्व भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी भारत निवडणूक आयोगाचे विशेष तज्ज्ञ अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले होते. पुढील वर्षी पंजाब राज्य विधानसभा निवडणुकीसाठी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


लोकसभा सार्वत्रिक निवडणूका 2019 मध्ये नाशिक येथील प्रक्रीया यशस्वीरित्या, प्रभावीपणे, निर्विघ्नपणे व अत्यंत शिस्तबद्धरितीने पार पाडण्यामध्ये अरुण आनंदकर यांचा मोठा वाटा होता. अहमदनगर आणि नाशिक येथे ‘उपजिल्हा निवडणूक अधिकारी’ म्हणून कार्यरत असताना त्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसहित सर्व प्रकारच्या निवडणुकीत निवडणूक विषयक कायदे, नियम यांची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करीत अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम राबविले. त्यांनी सूचविलेल्या अनेक संकल्पना भारत निवडणूक आयोगाने देश पातळीवर राबविल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण दिले आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी बोलतांना अरूण आनंदकर म्हणाले, “चाकोरीबद्ध काम करण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने मी इतर जबाबदाऱ्यांसोबत निवडणूक हा एक विषय निवडला. ज्यामुळे मला देशपातळीवर नाव मिळाले. या क्षेत्रात सतत अभ्यास करावा लागतो. दररोज नियमांत होणाऱ्या बदलांची नोंद ठेवावी लागते. नवीन संकल्पना राबवाव्या लागतात. निवडणूक या क्षेत्राची आवड असल्याने आज देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करु शकलो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *