समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमती देवून ५५ वर्षे तालुका मागे नेणाऱ्यांनी ५५ कोटींच्या बाता करू नये:- चंद्रकांत चांदगुडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- गोदावरी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची धूळफेक विद्यमान आमदारांनी केली आहे. हेड टू टेल असा निधी जणू काही आपल्या एकट्याच्या मतदारसंघात आला असे भासवण्याचा प्रयत्न आमदार काळे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.ज्यांनी पदांसाठी राजकीय संगीतखुर्ची खेळली आहे अशा लोकांनी कोल्हे कुटूंबावर टिका करण्याची त्यांची पात्रता नाही अशी घणाघाती चपराक भाजपाचे चंद्रकांत चांदगुडे यांनी सोमनाथ चांदगुडे यांचा नामोल्लेख टाळत लगावली आहे.
जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली म्हणूनच कोल्हे कुटूंब सर्वाधिक काळ सत्तेत असावे असा आशीर्वाद जनतेने दिला आहे.जनतेची दिशाभूल करून वागतात त्यामूळेच काळे कुटूंब सत्तेच्या बाहेर अधिक काळ राहिले आहे हा पूर्वइतिहास देखील सोमनाथ चांदगुडे यांनी बघायला हवा.कालवा सल्लागार समितीच्या बैठका कोपरगावमध्ये घ्या नाहीतर मंगळग्रहावर जाऊन घ्या फक्त शेतकरी बांधवांना पाणी द्या हेच शेतकरी सांगत होते पण फक्त कोपरगावला बैठकीचा फार्स विद्यमान आमदारांनी केल्याने मागच्या गत रोटेशनला शेतकरी किती हवालदिल झाले होते याचा विसर कुणालाही पडलेला नाही.जर कालव्यांना वेळेवर रोटेशनच नाही तर दुरुस्ती करून काय साध्य करणार ? धरणात पाणी असून शेती कोरडी ठेवण्याचे पातक करण्यात आमदार काळे यांचा सिहांचा वाटा आहे.
कालवा दुरुस्तीच्या गप्पा मारल्या जात आहेत परंतु दोनच दिवसांपूर्वी कालवा फुटला आहे.आमदार काळे यांच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी वर्गाचे होणारे हाल व नुकसान यापासून पळ काढण्यासाठी कोल्हे कुटूंबाकडे किती काळ सत्ता होती हे बोलून काळेंच्या या दोन वर्षातली निष्क्रियता लपणार नाही.स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठीच कदाचित आमदार काळे व त्यांचे कार्यकर्ते हे अकबर बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे काल्पनिक विश्वात रममाण झालेले असावे,उंचावर भांडे असतांना जमिनीवर आग पेटवून खिचडी शिजेल असा कयास लावण्यासारखा हा प्रकार आहे,असेही शेवटी चांदगुडे म्हणाले आहेत.

चौकट- समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमती देऊन विद्यमान आमदारांचे वडील माजी आमदार अशोकराव काळे यांनी तालुक्याचे वाळवंट करणारी भूमिका केली,यामुळे ५५ वर्षे तालुका मागे गेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ५५ कोटी कालवे दुरुस्तीला मिळवले असे म्हणणे म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला असा अजब प्रकार आहे.काळे कुटूंबाचा मोठा वाटा समन्यायी पाणी वाटप कायदा होण्यात आहे हे चांदगुडे यांनी माजी आमदार काळे यांच्याशी चर्चा करून समजून घेऊन मगच वायफळ बातम्या पेराव्या असा वर्मावर घाव चंद्रकांत चांदगुडे यांनी घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *