
आप आपसातले वाद मिटवून एक व्हा आणि भाजपचा पराभव करा मंत्री छगन भुजबळ यांची देगलूर वासीयांना साद…
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकितील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ मंत्री छगन भुजबळ यांची देगलूर मध्ये सभा…
कोपरगाव प्रतिनिधी (देगलूर):-
राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार हे मजबुतीने उभे आहे.आणि आम्हीच देगलुरच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. देगलूर येथील मोंढा मैदान याठिकाणी देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकितील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्यासह खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुळकर, आमदार अमरनाथ राजूरकर ,आ बालाजी कल्याणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,आनंद जाधव, अनुरुद्ध वनकर, मोगलाजी शिरशेटवार, बापूसाहेब भुजबळ, मकरंद सावे यांच्यासह देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी ते म्हणाले, ही सभा मला मोठ्या दुःखद अंतकरणाने घ्यावी लागत आहे. कै.रावसाहेब अंतापुरकर यांनी कोरोना काळात सर्व सामान्यांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात देखील त्यांचे जनसेवेचे काम चालू होते अश्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता जी निवडणूक होणार आहे त्यात रावसाहेबांचा मुलगा श्री. जितेश रावसाहेब अंतापुरकर हा महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. जितेश हा उच्च शिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण करून तो स्वतःच्या पायावर उभा होता. मात्र दुर्दैवाने रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि जितेशला निवडणुकीत भाग घ्यावा लागला आता आपली जबाबदारी आहे त्याला विजय केले पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.


ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी योग्य पद्धतीने काम करत आहे. कोरोना काळात भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे त्या उत्तर प्रदेश, आणि बिहार राज्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. त्याच्या कित्येक पटीने चांगले काम महाराष्ट्र राज्याने केले आहे.
देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत सर्वांनी आप आपसातले वाद मिटवत एकत्र आले पाहिजे आणि भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे असे आवाहनच मंत्री छगन भुजबळ यांनी देगलूर वासीयांना केले.
