राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून संजीवनी एकमेव मानकरी…
कोपरगांव प्रतिनिधी:- भारत सरकारच्या अखत्यारीतील आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (ए.आय.सी.टी.ई.), नवी दिल्लीने राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आयोजीत केलेल्या ‘ क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस ’ स्पर्धेत संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकने देशात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला असुन हा पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रातील सुमारे ३५० पाॅलीटेक्निक्स पैकी संजीवनी ही एकमेव संस्था आहे. संजीवनी पाॅलीटेक्निकने आज पर्यंत देश पातळीवर अनेक किर्तीमान स्थापित केले असुन, नव्याने मिळालेल्या पुरस्काराने संजीवनीच्या वैभवात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदरचा पुरस्कार भारताचे शिक्षण , कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री धमेंद्र प्रधान यांचे हस्ते नवी दिल्ली येथिल ए.आय.सी.टी.ई. च्या सभागृहात शानदार सोहळ्यात संजीवनी पाॅलीटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर व प्रा. योगेश पवार यांनी स्विकारला. यावेळी व्यासपीठावर केंद्रिय शिक्षण राज्य मंत्री डाॅ. राजकुमार रंजन सिंग,मानव संसाधन व विकास मंत्रालयाचे सचिव श्री अमित खरे, एआयसीटीईचे चेअरमन डाॅ. अनिल सहस्रबुध्दे, व्हाईस चेअरमन डाॅ. एम.पी. पुणिया, मेंबर सेक्रेटरी डाॅ. राजीव कुमार उपस्थित होते.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की एआयसीटीईच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. स्वच्छता आणि पर्यावरण पुरक जागृतीच्या दिशेने प्रत्येक संस्थेच्या कॅम्पसची वाटचाल व्हावी, वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट कॅम्पस बनविण्याच्या दृष्टीने आणि त्या संस्थेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुध्दा स्वच्छ व स्मार्ट भारत घडविण्याच्या दृष्टीने प्रेरीत व्हावे, असा या स्पर्धेचा हेतु आहे.
संजीवनी नी पाॅलिटेक्निकचे प्राचार्य मिरीकर, प्रा. पवार, प्रा. वैभव परजणे यांनी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली विविध बाबींचे सादरीकरण ऑनलाईन पध्दतीने एआयसीटीईला दिले. त्यात प्रामुख्याने ओला कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार करून तेच कॅम्पस मधिल झाडांना देणे व सुका कचरा बाहेर रिसायकलींगसाठी देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील संबंधितांच्या येण्याजाण्यावर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण, सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे चार चाकी अथवा दुचाकी वाहनांचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ केलेली पार्किंग व्यवस्था की ज्यामुळे वाहनांच्या धुराड्यांमधून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते, कॅम्पस मधिल झाडी आणि पार्किंग व्यवस्थेमुळे कॅम्पस मध्ये बाहेरच्या वातावरणापेक्षा १० टक्के अधिकचे ऑक्सिजन प्रमाण, वाटर हार्वेस्टिंग, पाॅलिटेक्नकच्या तीन इमारतिंसह, वसतिगृह व इतर कॅम्पससाठी आगीच्या संदर्भातील बंदिस्त पाईपलाईनद्वारे घेण्यात आलेली सुरक्षा, मागील पावसाळ्यापासून संस्थेच्या कॅम्पसमध्ये तसेच नजिकच्या रस्त्यांवर केलेली वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धण, संस्थेत उभारलेला ५०० किलोवॅटचा सौर उर्जेवरील प्रकल्प व त्यापासुन औष्णिक विद्युत केंद्रांमधिल थांबलेले विषारी वायु उत्सर्जन, वेस्ट वाटर चे रिसायकलिंग करून ते कॅम्पस तसेच नजिकच्या वृक्षांसाठी वापरणे, पर्यावरण जागृती कार्यशाळांचे आयोजन, इत्यादी बाबींचे पुराव्यांसहित समावेश होता. सादरीकरण करणाऱ्या टिमला श्री विजय नायडू , डॉ . आर. ए. कापगते, प्रा. विपुल पटेल व प्रा. नागोराव सुरणार यांचेही सहकार्य लाभले.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी संजीवनी पाॅलीटेक्निकला मिळालेल्या पुरस्काराबध्दल आनंद व्यक्त करून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

फोटो ओळी:- एआयसीटीई, नवी दिल्ली आयोजीत क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस अवार्ड स्पर्धेत संजीवनी पाॅलीटेक्निकने देशात दुसरा व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला. शिक्षण , कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री धमेंद्र प्रधान यांचे हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य ए. आर. मिरीकर व प्रा. योगेश पवार.
