
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील काही रस्त्यांची भयानक दुरावस्था झालेली आहे यात दुमत नाही.रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे होणारे हाल व 28 विकास कामांना मे.उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हे विषय चर्चेचे होऊन सर्वत्र कोपरगाव शहराची बदनामीही होत आहे.
आज मी या पत्रकाद्वारे सर्व राजकिय नेते-कार्यकर्ते यांना नम्र विनंती करतो कि, नागरिकांचे हाल होत असतांना चालू असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे सर्वच राजकारणीही बदनाम होत आहेत.हे सर्व थांबविण्यासाठी मे.उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या सर्व संबंधितांना व सर्वांनाच मी विनंती करतो कि,आतापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप, मान-अपमान,राजकिय हेवेदावे विसरून मे.उच्च न्यायालयातून आणलेली स्थगिती उठविण्यासाठी अर्ज देऊन स्थगिती उठवावी तरच नागरिकांचे हाल थांबणार आहेत.
त्यानंतर आपण सर्व पक्षांचे गटनेते व 2 त्रयस्थ तज्ज्ञांची समिती नेमून सर्व कामे दर्जेदार करून घेऊ.एस्टीमेट कितीही रकमेचे असले तरी जेव्हढे काम होईल तितकेच मोजमाप करून
ठेकेदारांची देयके अदा करू.
राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात,तरी आपण कुणीही एकमेकांचे शत्रू नाही.निवडणूक येईल त्यावेळी प्रत्येकाला आपल्या पक्ष-गटाचे समर्थन करण्याचा अधिकार आहे.पण राजकिय हेवे दाव्यांचा
अतिरेक होऊन आपण सर्वजण
जनतेच्या मनातून कायमचे उतरायला नको इतके तरी भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.आज मी कुणावरही दोषारोप करणार नाही.शहरात विकासकामे व्हावीत हेच महत्वाचे आहे,असे वाटते.
स्थगिती उठवून कामे झाली नाहीत तर येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीनंतरही असेच गढूळ वातावरण राहिले,एकमेकांना अडथळे आणले गेले तर ते कोपरगाव शहराच्या विकासाच्यादृष्टीने योग्य होणार नाही.श्रेय हा विषय मला तरी मान्य नाही.कारण मतदारांनी सर्वांना विकास कामे करण्यासाठीच निवडून दिलेले असते. सर्वांच्याच सहकार्याने विकासकामे मार्गी लागत असतात.
