येवला येथील कृष्णा या ७ वर्षाच्या बालकासाठी धावुन आले एस जे एस हॉस्पिटल:- एस जे एस हॉस्पिटल संचालक प्रसादजी कातकडे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- नियती कोणाशी कसा खेळ खेळेल हे सांगणे अवघड आहे. जगात अनेक व्यक्ती दुर्धर आजारांशी लढत आहेत . मात्र असाच एखादा दुर्धर आणि महागडा उपचार असलेला आजार जर एखाद्या गरीब कुटुंबाच्या वाट्याला आला तर त्याने कोणाकडे बघायचे हा प्रश्न रुग्णाच्या नातेवाइकांसह कोणाही संवेदनशील व्यक्तीस पडू शकतो . येवला येथील कृष्णा या ७-८ वर्षाचा बालक एक दिवस ताप येऊन बेशुद्ध पडला .

त्याचे पालक त्याला तातडीने नजीकच्या दवाखाण्यात घेऊन गेले. तेथे तात्पुरता इलाज करून पुढील उपचारासाठी कोपरगाव येथे व नंतर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले . तेथे त्याला कन्जनाईटल अॅड्रीनल हायपरल्पाझीया या दुर्धर आजराने ग्रासल्याचे निदान झाले . या आजाराचे जेव्हढे अवघड नाव तेव्हढाच त्याचा उपचारही महागडा आहे. साईबाबा रुग्णालयात कृष्णावर प्राथमिक उपचार केले. मात्र त्याच्या पुढील उपचारासाठी प्रत्येक महिन्याला साधारण ८ ते ९ हजार रुपयांचे इंजेक्शन आणि इतर औषधोपचारासाठी वेगळी रक्कम किमान तीन वर्षे सुरु ठेवावे लागणार असल्याचे समोर आले.

कृष्णाच्या पालकांच्या घरात आधीच अठरा विश्वे दारिद्र्य . वडील पवन खलसे एका हाताने व पायाने जन्मजात अपंग तर आई पूजा खलसे या धुनी भांडी घासून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करीत असल्याने त्यांना कृष्णाचा हा महागडा व दीर्घकाळ चालणार उपचार परवडणारा नव्हता .

यावेळी त्यांनी साईबाबा रुग्णालय आणि इतरत्रही मदतीची मागणी केली . मात्र मदतीस लागणार वेळ पाहून कृष्णाच्या पालकांनी त्याला उपचाराविनाच घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला . यावेळी कृष्णाच्या आजाराची व त्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती श्री संत जनार्दन स्वामी रुग्णालयाचे संचालक प्रसाद कातकडे यांना कळली . त्यांनी त्वरित कृष्णा आणि त्याच्या कुटुंबियांना आपल्या रुग्णालयात बोलावून घेतले. त्याच्या आजाराची माहित घेऊन त्याच्या उपचाराचा आजार पूर्णतः बरे होण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला . प्रसाद कातकडे हे चालवीत असलेले रुग्णालय हे गरिबांवर मोफत व अल्प दरात उपचार करणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते . आणि आता तर कातकडे यांनी कृष्णा सारख्या बालकाचा उपचाराचा खर्च उचलून आपल्यातील संवेदनशीलतेचाही प्रत्येय आणून दिला .
या आजाराबाबत एस जे एस रुग्णालयाच्या बालरोग तज्ञांना विचारले असता त्यांनी सांगितले कि हा अत्यंत दुर्मिळ आजार असून काही लाख बालकांमध्ये एखाद्याला हा आजार होऊ शकतो . यामध्ये बालक अकाली प्रौढ होऊन त्याच्या हाडांची व अवयवाची त्याच्या वयापेक्षा दुप्पट वाढ होते. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यातही या साठी असणारे उपचार अत्यंत महागडे व दीर्घकाळ असल्याने उपचार अपूर्ण राहून रुग्ण दगावतात.
मी फक्त माझे कर्तव्य केले – प्रसाद कातकडे याबाबत प्रसाद कातकडे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सुरवातीला प्रतिक्रिया देण्यास फार उत्सुकता दाखविली नाही . कृष्णाच्या उपचाराचा खर्च उचलून फार मोठे काम केले नाही. तर मी माझे फक्त कर्तव्य पार पाडले आहे. आमच्या रुग्णालयात अनेक गरीब रुग्ण येतात त्यांच्यावरही रुग्णालयाकडून मोफत उपचार केले जातात. आम्ही केवळ संत जनार्दन स्वामींच्या व साईबाबांच्या क्रुपा आशिर्वादाने जनसेवेचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.


प्रसाद भाऊंच्या रूपाने देव भेटला !
कृष्णाच्या उपचाराची आशा मावळलेली असताना प्रसाद कातकडे यांनी देवासारखे धावून येत आमच्या कृष्णाचा जीव वाचविला आहे.आम्ही मोल मजुरी करणारी माणसं आहोत .आमच्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असताना कृष्णावर उपचार करणे शक्य नव्हते . त्यामुळे आम्ही कृष्णाच्या जीविताची आशा सोडली होती . मात्र प्रसादभाऊ कातकडे यांनी अनपेक्षितपणे येऊन कृष्णाच्या उपचाराची जबाबदारी घेत कृष्णाला जीवदान दिले . खरचं प्रसादभाऊंच्या रूपाने आम्हाला देवच भेटला आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *