
कोपरगाव प्रतिनिधी:-
असतात काही माणसं आपल्या मेहनत आणि कामावर निष्ठा ठेवतात. आदर्श जीवनतत्वावर नितांत श्रद्धा ठेवून आयुष्याचा प्रवास करत असतात.तत्व अन् शब्दाला जागणारी माणसं समाजात फार कमी असतात.असचं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अॅड.शंकरमामा आढाव…
शेकडो वर्षांपूर्वी नरोडे,आढाव,गवारे,जोशी,ठोंबरे,तांडेल,कोपरे अशी आडनावे असलेल्या मोठ्या कुटुंबांचा बोलबाला गोदावरी तीरावर वसलेले कोपरगावात असायचा.अशा कोपरगावच्या मुळ घराण्यापैकी “आढाव” हे जुने घराणे आहे.यातील शेतकरी सखाराम पाटील आढाव यांना चार मुलं आणि चार मुली…अँड.शंकरराव, डॉ.शांताराम,डॉ.शिरिष आणि शिवाजीराव अशी मुले तर हिराबाई सूर्यभान आठरे(कोपरगाव),इंदूबाई जाधव(शहा-कारवाडी),रेणुकाताई रामकृष्ण महाले(कोपरगाव),सिंधूताई किसनराव घुमरे (पुणे) या चार मुली…अशा भावंडात
शंकरराव आढाव यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४० रोजी शेतकरी कुटुंबात झाला.वडील सखाराम पाटील शेतकरी तर आई देवूबाई गृहिणी होत्या.
लहानपणापासून शंकरराव यांना शिक्षणाची आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे झाले.त्यांचे आवडते शिक्षक हडपे सर यांनी त्यांना ज्ञानाचे बाळकडू दिले. पुढे पुणे येथे उच्च शिक्षणात फर्ग्युसन कॉलेज येथुन बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर आय.एल.एस.महाविद्यालय पुणे येथे कायद्याची पदवी संपादन केली.
शंकरराव यांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कोपरगाव येथे परतले.कोपरगाव तालुक्यात विधि क्षेत्रात अँड.सूर्यभान आठरे यांचा नावलौकिक होता.अॅड. शंकरराव यांनी १९६६ सालापासून वकिली व्यवसायाला आठरे वकीलांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. वकिली व्यवसाय सुरु असताना कोपरगाव सहकारी साखर कारखाना निमित्ताने शंकररावजी काळे साहेब त्यांच्या सहवासात आले.कोसाकाचे संचालक म्हणून शंकरराव निवडून आले.त्या काळात कारभारी जाधव,सुधाकर आवारे,छबुराव आव्हाड, आप्पासाहेब होन, शंकरराव आढाव ही पाच व्यक्तीमत्वे शंकररावजी काळे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जात. काळे साहेबांच्या सुविद्य पत्नी सुशिलामाई काळे ह्या पाच सहकाऱ्यांना "पांडव" म्हणून संबोधत असे.
कोसाका उद्योग समूहाच्या कुकूटपालन, गोदावरी खोरे केन,पेपर मिल, गौतम पब्लिक स्कूल यासह विविध संस्थांवर सलग २२ वर्षे शंकरराव आढाव यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
कोसाका कारखान्यामध्ये काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या संचालक मंडळात फूट पडली आणि शंकररावजी कोल्हे साहेब यांनी स्वतंत्रपणे पॅनल तयार केला. या पॅनल मध्ये तुम्ही या.... तुम्हाला कारखान्याचे चेअरमन करतो अशी शंकररावजी कोल्हे साहेबांनी अॅड.शंकरराव आढाव यांना संधी देऊ केली. परंतु काळे साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही.या भावनेतून जागणारे अॅड. शंकरराव यांनी अतिशय नम्रपणे नकार दिला व शेवटपर्यंत काळे साहेबांचे सहकारी म्हणून सोबत राहण्याचा मनोदय व्यक्त केला.
नासिक सह निफाडच्या पाणी वापर सोसायट्यांमुळे कोपरगावचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला.कोपरगांवचे हक्काचे पाणी कमी होऊ लागले अशा प्रसंगी महाराष्ट्र शासना विरुद्ध अॅड.शंकरराव आढाव आणि अॅड.वसंतराव कोर्हाळकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला.अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करून न्यायालयात दावा यशस्वीरित्या जिंकला. शंकररावजी काळे साहेब यांनी सार्वजनिक सभेत दोन्ही वकिलांना (अॅड.शंकरराव आढाव आणि अॅड.वसंतराव कोर्हाळकर) एक-एक तोळ्याची सोन्याची अंगठी भेट देऊन तोंड भरुन कौतुक केले.याच काळात अॅड.शंकरराव गोदावरी नदी परिसरातील सर्व धरणे प्रत्यक्ष फिरुन अभ्यास केला.
कोपरगाव न्यायालयात सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ वकीली व्यवसाय केला.कोपरगांव न्यायालयात पितृत्व लादल्याचा खटल्यात अॅड.शंकररावांनी मिळून दिलेला न्याय आजही चर्चिला जातो. कोपरगांव वकील संघाचे "अध्यक्ष" म्हणून काम पाहिले आहे.
अॅड.शंकरराव हे पत्नी रंजनाताई यांची मोलाची साथ लाभली असल्याचे आवर्जून सांगतात.शंकरमामांचे वकील क्षेत्रासोबत विविध सहकारी संस्थांच्या जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असतांनाच रंजनाताई शेती व्यवसाय पुर्ण सांभाळत आहे.सोबत मुलांना उच्च शिक्षण दिले.मोठा मुलगा वैभव यांचे भारती विद्यापीठ पुणे येथे औद्योगिक अभियंता व व्यवसाय तज्ञ पदवी संपादन केली आहे.तर मुलगी सौ.स्वप्ना राहुल पोखरकर ह्या कॅनडा येथे अॅनिमेशन तज्ञ म्हणून काम पहातात.सर्वात लहान मंदार हे अभियांत्रिकी अभियंता आहे.शंकरमामांचे सूना सौ.गितांजली व सौ.जान्हवी या उच्च शिक्षित आहे.नातू साहिल,अमन,कु. राजहंस,कु.मनस्वी,पियुश हे उच्च शिक्षण घेत आहेत.
अॅड.शंकरमामा कोपरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून १९९२ पासून कामकाज पहातात.सोसायटीच्या रचनेत सखाराम पा आढाव,सुर्यभान पा महाले,म्हाळू पा आढाव, माधवराव आढाव, माधवराव बाजीराव आढाव यांचे योगदान असल्याचे आवर्जून सांगतात.
अॅड.शामराव भोकरे यांचे आग्रहाखातर शंकरमामा मराठा पंच मंडळ ट्रस्टचे अध्यक् म्हणून कामकाज पहातात.म्हाळू पा आढाव, बाबुराव नरोडे,शंकर जयाजी आढाव यांचेसह अनेकांचे मराठा पंच मधील योगदानबद्दल शंकरमामा आवर्जून सांगतात.या माध्यमातून ग्रामदैवत बिरोबा(विरभद्र) मंदिर, कोपरगावचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर यासह विविध कारभार पाहिला जातो.मराठा पंच जागेत महाराष्ट्रातील उल्लेखनीय पुतळ्यांपैकी कोपरगाव शहराचे वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजीमहाराज यांचा देखणा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी उभारण्यासाठी योगदान देणारे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे,मंगेशराव पाटील यांना मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष म्हणून अॅड.शंकरमामा यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
शंकरमामा गप्पांच्या ओघात मदन गुजराती बालपणापासूनचा मित्र असल्याचे आवर्जून सांगतात.तर पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेतांना होस्टेलचे रुम पार्टनर गोविंदराव आदिक, दौलतराव पवार, संपतराव कडू(माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचे वडील) या मित्रांची आठवण सांगतात.
कायदेशीर ज्ञान, मीतभाषी स्वभाव,सभ्य माणसांच्या पंगतीत वावरणारे शंकरमामा धार्मिक कार्यात न रमता सत्कर्माला नेहमी स्थान देतात.गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात मदत केल्याचे अनेक जण सांगतात.मामांनी ज्ञानी आणि गुणी माणसाला नेहमी आदराने वागणुक दिली आहे.त्यामुळे त्यांना सर्व जातीधर्माच्या लोक "मामा" या आपुलीच्या नात्याने हाक देतात.
आजही कोणी किती लहान व्यक्ती सोबत बोलतांना "अहो-काहो" अशा पध्दतीने बोलणे हे एक सभ्य व्यक्तीमत्वाचे उदाहरण आहे.मामा वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ग्रामदेवता चरणी प्रार्थना आहे. सभ्यतेच्या वाटेवर मार्गक्रमणाच्या दिशादर्शक मामांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन...
शब्दांकन : सुशांत घोडके
(लेखक हे गोदावरी तीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य आहेत…)
