
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणारा गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा महापुरामध्ये दोनदा वाहून गेला होता. या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम होण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांची भेट घेवून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्या मागणीला जलसंपदा विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत माती परीक्षण करून मंजूर बंधाऱ्याचे डिझाईन करण्याचे आदेश दिले होते. केलेल्या माती परीक्षणानुसार या बंधाऱ्याचे डिझाईनचे काम (प्रारूप आराखडा) पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे मायगाव देवी ते धामोरी रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण व भारत भुसारे दुकान ते भास्कर चुंबळे शेती रस्ता व सुदाम पगारे शेती ते राधाकिसन गाडे घर आदी रस्त्याचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मायगाव देवी येथील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेणुका माता देवस्थानास माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात भरघोस निधी उपलब्ध करून देवून मायगाव देवी गावासाठी पाणी योजना मंजूर केली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हि योजना त्यावेळी पूर्ण होवू शकली नाही. आजही मायगाव देवीच्या ग्रामस्थांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे मात्र नागरिकांना भेडसावणारा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. नदीकाठच्या गावांना जोडणारा व कोपरगाव येथे जाण्यासाठी अतिशय जवळचा असणारा धारणगाव,सोनारी, मायगाव देवी, मंजूर हा अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या (प्रजिमा-८) या अंदाजे ९ किलोमीटर रस्त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून ७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यश मिळाले असून येत्या काही महिन्यात या रस्त्याच्या कामास प्रारंभ होणार आहे. या रस्त्यामुळे धारणगाव,सोनारी, मायगाव देवी, मंजूरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होणार आहे. मायगाव देवी हे गाव श्री रेणुका मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून गावाला पौराणिक महत्व आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे शेकडो मैलावरून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नाही. तालुक्यातील इतर देवस्थानांप्रमाणे श्री रेणुका माता देवस्थानचा विकास करून भविकांची होत असलेली गैरसोय दूर करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य अनिल कदम, श्रीकृष्णराव गाडे, सुदामराव गाडे, प्रभाकर गाडे, धोंडीराम गाडे, रविंद्र गाडे, दिलीप गाडे, सरपंच दिलीप शेलार, उपसरपंच मुकुंदराव गाडे, साहेबराव गाडे, काशीनाथ गाडे, नामदेव साबळे, कारभारी कदम, श्रावण चुंबळे, अशोक बैरागी, बाळासाहेब गाडे, शिवाजीराव नाजगड, राजेंद्र गाडे, आण्णासाहेब गाडे, श्रीकांत गाडे, बापू गाडे, रामदास केकाण, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती शाखा अभियंता दिघे, ग्रामपंचायत सदस्य शरद भुसारे, दशरथ माळी, सुभाष साबळे, बाबासाहेब गाडे, भगवान गाडे, भगवान कदम, साईनाथ पवार, ग्रामसेवक भगवानराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ:- मायगाव देवी ते धामोरी रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण व गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.
