धोत्रे परिसरातील 65 लाख रुपये खर्चाचे कामाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जनतेच्या विकासाची नाळ जुळल्यामुळेच आपण नेहमी कुणालाही नडविण्याची भूमिका न घेता छोट्या-छोट्या कामात गावच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जोपासला, पण जे दुसऱ्यांना फसवण्यासाठी गेले त्यात त्यांचीच फसगत झाली. धोत्रेवासियांनी गावच्या विकासात मोलाचा वाटा दिला. कामात निष्ठेला महत्त्व आहे, त्यातून न्याय मिळतो असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोरोनात जिवाभावाची माणसे गेली, अजूनही मारामारी संपलेली नाही, मानसिकदृष्ट्या खचलेल्यांनाही आधार देण्याचा अल्पसा प्रयत्न केला असल्याचेही त्या म्हणाल्या.
तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत अंतर्गत 65 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चाच्या संस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण भाजपाच्या प्रदेशाचे स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी झाले त्याप्रसंगी ते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी दत्तात्रय कोते होते. प्रारंभी सरपंच साधना गवारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी सरपंच मनोज चव्हाण यांनी विकास कामांची माहिती दिली. याप्रसंगी सर्वश्री मुजाफरभाई सय्यद, माजी सभापती मच्छिंद्र टेके, माजी उपाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे, सुरेश जाधव, संजय जामदार, ज्ञानदेव आगवण, विजय जामदार, अशोकराव माळवदे, विष्णुपंत क्षीरसागर, संदीप भाटे, कैलास चव्हाण, भीमराज मोकळ, विजय काटे, संजय साळुंखे, दारकू जानराव, गिरिजानाथ जानराव, संजय जानरावआदी उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुरेश चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व माजी सरपंच मनोज चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त सौ स्नेहलता कोल्हे यांच्या सत्कार करण्यात आला.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी अल्पभूधारक व जिरायती भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यांना मदतीची उभारी देत मोठं केलं. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी ग्रामीण अर्थकारणाला पाठबळ देत कार्यकर्त्यांच्या कामाला पसंती देऊन त्यांचे प्रश्‍न शासकीय निमशासकीय व अन्य योजनेतून कसे मार्गी लागतील याचा सतत ध्यास घेतला. त्याच पावलावर पाऊल ठेवून गेल्या पाच वर्षांच्या काळात आपण कोपरगाव शहर व मतदार संघातील असंख्य प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव तयार करून ते मंत्रालयस्तरा पर्यंत पोहचवले, त्यामुळेच या विकासाला मोठा निधी मिळत आहे. धोत्रे पंचक्रोशीतील महिला बचत गटाचे काम मोठे आहे. त्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना चालना देण्याचे काम केले. समृद्धी महामार्गातील संपादित जमीनीला पाच पट जादा मोबदला मिळवून दिला. या भागातील नांदूर मधमेश्वर कालवा, वितरीका, पाटपाणी शेतकऱ्यांचे भूसंपादनाची रक्कम इत्यादी प्रश्न मार्गी लावले. शेवटी विजय जामदार यांनी आभार मानले.
चौकट:-
विकास कामात दोन पायांची मांजरे आडवी गेली की, त्यांचा खेळ खंडोबा होतो, अशी उपहासात्मक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी बोलताना केली.

फोटो ओळी :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत अंतर्गत 65 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटने भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी १० लाख रुपये खर्चाच्या संस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *