जीवघेण्या संकटात स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे कौतुकास्पद :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:– मागील वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे प्रत्येकाच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली असतांना स्वतःहून कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करून आपला व आपल्या कुटुंबाचा विचार न करता बाधित रुग्णांची सेवा करणे अभिमानास्पद असून स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे कौतुकास्पद असल्याचे गौरवदगार आ. आशुतोष काळे यांनी काढले. कोपरगाव येथील डॉ. घायतडकर डेंटल क्लिनिकच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड पश्चात होणाऱ्या आजारांसंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आ. काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वोतोपरी उपाय योजना केल्या. मात्र आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे डॉक्टरांची उणीव भासत असतांना डेंटल स्पेशालीस्ट असलेले डॉ. कुणाल घायतडकर व त्यांच्या पत्नी डॉ.सौ. भाग्यश्री घायतडकर दापत्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये बाधित रुग्णांची सेवा केली व कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस, हृदयरोग, किडनीचे आजार, मानसिक आजार, ताण-तणाव, अशक्तपणा आदी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी शिबीर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून कोविडमधून बरे झाल्यानंतर होणारे आजार टाळण्यासाठी व यदाकदाचित काही बाधा जडली तर कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे यासाठी हे शिबीर महत्वाची भूमिका बजावणार असून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी प्रास्तविक करतांना डॉ. कुणाल घायतडकर म्हणाले की, कोरोना हा जीवघेणा आजार असून आजही कोरोनाचे रुग्ण जरी सापडत असले तरी ते प्रमाण इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगावमध्ये निश्चितपणे कमी आहे. आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला सर्वतोपरी मदत वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे आरोग्य विभागाचे काम अतिशय सोपे झाले. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्य विभाग पोहोचत असून कोरोना संसर्ग रोखण्यात मदत मिळाली आहे. जीवघेण्या संकटात एकही दिवस घरी न थांबणारा व सतत जनतेची काळजी करणारे आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने लाभले असून ते करीत असलेली निस्वार्थी समाजसेवा पाहुन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हे आरोग्य शिबीर आयोजित केले असल्याचे सांगत वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

                     यावेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरूण चंद्रे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, फकीर कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, डॉ. दीपक पगारे, डॉ. राजेंद्र वाघडकर, डॉ. संदीप वाबळे, डॉ. आसिफा पठाण, डॉ. सौ. दिपाली आचारी, डॉ. रणदिवे, शिवाजी घायतडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण चंद्रे व रोहिणी घायतडकर यांनी केले तर आभार डॉ.सौ. भाग्यश्री घायतडकर यांनी मानले.

फोटो ओळ- कोविड पश्चात होणाऱ्या आजारांसंदर्भात घ्यावयाची काळजी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *