कोपरगाव प्रतिनिधी:- “विद्यार्थ्यांनी पदवीसाठी किंवा केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणून विषय न निवडता आपली आवड व गती बघून बघून विषय निवडावा, स्पर्धा परीक्षेसाठी पदवी स्तरावरील गुणवत्तेबरोबरच स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची असते केवळ कुणीतरी सांगितलं म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करू नये, तसेच कला व वाणिज्य विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांनी अगदी बारावी पासून यूपीएससीची तयारी करावी” असे प्रतिपादन अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी मा. सिद्धार्थ भंडारेसाहेब यांनी केले ते यूपीएससीचा अभ्यास करणार्या उमेदवारांसाठी आयोजित मार्गदर्शनपर ऑनलाइन व्याख्यानसत्रात बोलत होते. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकचे संचालक मा. डॉ. मालोजीराव भोसले यांची विशेष उपस्थिती या प्रसंगी होती. मा. भंडारेसाहेब पुढे म्हणाले की “स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये स्मार्टफोन हा अत्यंत वेगाने मागे खेचणारा मोठा सायलेंट किलर आहे त्याचबरोबर मित्रपरिवार कुटुंब व आई-वडील यांची सकारात्मक भूमिका विद्यार्थ्यांना लवकर यशोशिखरावर नेते.” या प्रसंगी दुसरे वक्ते व सांगली येथील जिल्हाधिकारी मा. विशाल नरवाडेसाहेब (आय.ए.एस.2020 बॅच) म्हणाले की “”विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चुका सुधारून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वतःचा उत्तम असा बी प्लॅन सुद्धा तयार ठेवावा यूपीएससी चा अभ्यास करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी शक्यतो आत्मविश्वास वाढवणार्या शाखेतूनच पदवीचे शिक्षण घ्यावे.त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा अधिक बाऊ न करता कमपुरती इंग्रजी शिकुन देखिल यशस्वी होता येते हे समजून घ्यावे.” या व्याख्यानसत्रात यूपीएससीच्या उमेदवारांचा उत्साह द्विगुणित करताना मा. डॉ. मालोजीराव भोसले साहेब यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवक स्पर्धा परीक्षांमध्ये उतरला पाहिजे व त्याला आवश्यक रिसोर्सेस सहज उपलब्ध झाले पाहिजे तरच ग्रामीण भागातील युवकांचा यूपीएससी परीक्षांमध्ये व पर्यायाने सनदी सेवेत सहभाग वाढेल व महाराष्ट्राचे नाव अग्रभागी येईल,अशी आंतरिक तळमळ व्यक्त केली. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक महाराष्ट्र शासन व के.जे.सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले या व्याख्यानात संपूर्ण महाराष्ट्रातून सव्वा तीनशे हून अधिक उमेदवार उपस्थित होते. प्रामुख्याने यात कोपरगाव व राहाता तालुक्यातील एकूण अकरा महाविद्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली होती. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय,कोपरगाव, एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव, सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालय, कोळपेवाडी, संजीवनी फार्मसी महाविद्यालय, कोपरगाव, श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी, साई निर्माण महाविद्यालय शिर्डी, महिला महाविद्यालय कोपरगाव, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राहाता या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने सहभाग होता.या सर्व महाविद्यालयांचे समन्वयक महाविद्यालय म्हणून के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने काम पहिले.
या ऑनलाइन व्याख्यान सत्रासाठी कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. मा.संजीवदादा कुलकर्णी व मा. संदीपदादा रोहमारे यांनी शुभेच्छा दिल्या.या व्याख्यानच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या व्याख्यानाचे प्रास्तविक महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे यांनी केले. तसेच मान्यवरांचे स्वागत व परिचय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ अभिजीत नाईकवाडे, प्रा. रवींद्र जाधव आदींचे सहकारी लाभले.
फोटो ओळ १:- के.जे.सोमैया महाविद्यालयात यू.पी.एस.सी. मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा.सिद्धार्थ भंडारेसाहेब उपजिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा.

फोटो ओळ २:- के.जे.सोमैया महाविद्यालयात यू.पी.एस.सी. मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा.सिद्धार्थ भंडारेसाहेब उपजिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा व आय.ए.एस. मा.विशालजी नरवडे जिल्हाधिकारी सांगली

