
कोपरगाव प्रतिनिधी:-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या वर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट होणार आहे. हा सोहळा आता ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून हा निर्णय राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी भगव्या स्वराज्य ध्वजासह स्वराज्य गुढी उभारून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून सर्व शासकीय कार्यालयात कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख यांनी कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात “शिवस्वराज्य दिन” कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
