
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तीच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ख्याती असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये मंगळवार (दि.१४) रोजी इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांची प्रवेश प्रक्रिया पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या शिक्षण पद्धतीवर पालकांचा दृढ विश्वास असल्याने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांसह विद्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या एकदिवसीय प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते. गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कूलने नियोजित केलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच निकाल जाहीर करण्यात येवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे प्रवेश तात्काळ निश्चित करण्यात आले.
प्रवेश निश्चितीनंतर शाळा प्रशासनाकडून नूतन विद्यार्थी आणि पालकांसाठी एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य नूर शेख म्हणाले की, गौतम पब्लिक स्कूल ही राज्यातील दुर्मिळ शाळा आहे जिथे कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. केवळ गुणवत्तेच्या जोरावर पालक स्वतःहून आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात. विद्यार्थ्यांचे भविष्य सक्षम करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच गौतम परिवाराचे मुख्य ध्येय असून त्यासाठी संपूर्ण शिक्षक वृंद संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे निरीक्षक नारायण बारे, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश निश्चित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे,सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी अभिनंदन केले आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक, हाऊस मास्टर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट :- इयत्ता १ ली ते १० वी हा शालेय जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि घडणारा सुवर्णकाळ मानला जातो. त्यामुळे उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षणासाठी पालकांची या विद्यालयाला अग्रक्रमाने पसंती लाभते. शाळेचा दरवर्षी शंभर टक्के यशस्वी निकाल हा तिच्या गुणवत्तेचा ठळक पुरावा असून, शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे जिव्हाळ्याने व वैयक्तिक लक्ष देतात. सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय, अत्याधुनिक डिजिटल वर्गखोल्या आणि मैदानी क्रीडांना दिले जाणारे विशेष स्थान ही या विद्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या अंगी दडलेल्या विविध कला-गुणांना वाव देऊन, विविध स्पर्धांमध्ये सहभाग घडवून त्यांच्या आत्मविश्वासात भर घालण्यावर शाळेचा विशेष भर दिला जातो.-सौ.चैतालीताई काळे (सचिव)
