माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक, अजितदादांच्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल :- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावाती नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, ही हानी कधीही न भरून निघणारी आहे, अशी भावना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली. स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून स्व. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार हे केवळ एक कणखर प्रशासक नव्हते, तर जमिनीवरचा नेता म्हणून त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबतच्या आठवणी आजही प्रेरणादायी असून, त्या आठवणींना उजाळा देताना मन गहिवरून येते.मुख्यमंत्री दालनात दादांच्या अपघातापूर्वी काही तास अगोदर झालेली भेट आणि चर्चा कायम स्मरणात राहील.अनेकदा दादांनी भेटीसाठी दिलेली वेळ आणि तंतोतंत त्या आधीच निरोप यायचा आपण आलाय का ? इतकी वेळेची काटेकोरता होती.अगदी अपघात होण्यापुर्वी शेवटच्या स्वाक्षरी देखील जनतेच्या कामाच्या फाईलवर करून उशिरा पर्यंत काम केले असे जनतेसाठी वाहून घेतलेले नेतृत्व काळाने आपल्यापासून हिरावले आहे.

विविध संस्थाच्या कामकाजाबद्दल आमची होणारी भेट आणि त्या मिटिंगमध्ये मला आवर्जून विवेक तुला काही मांडायचे आहे का असे विचारणारे ते नेते होते.माझ्यासारख्या अनेक युवकांना शिकण्यासारखे खूप काही होते.राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि सामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ कायम स्मरणात राहील.
स्व. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या कार्यातून आणि विचारातूनच त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कठीण प्रसंगी ईश्वराने संपूर्ण पवार कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थनाही विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
या सर्वपक्षीय शोकसभेस विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *