
‘विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवून अवांतर वाचनावर भर द्यावा’ :- नगराध्यक्ष पराग संधान…
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी मोलाचा सल्ला दिला.
यशासाठी शॉर्टकट नको. “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना ‘शॉर्टकट’चा पर्याय निवडू नये. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता अवांतर वाचनावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी आपली इच्छाशक्ती दुर्दम्य ठेवून आयुष्यात मोठे अधिकारी बनण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे.”
चिकाटी आणि एकाग्रता यशाची गुरुकिल्ली – मुख्याधिकारी सुहास जगताप
मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आपल्या मनोगतात उपस्थीत विद्यार्थ्यांच्या सातत्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे. अभ्यासात एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असून, मोबाईलचा वापर फक्त अभ्यासाकरिता करावा. वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे.”
करिअरच्या नवनवीन वाटा शोधा – डॉ. माधव सरोदे
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनिअरिंग आणि मेडिकल या पारंपरिक क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या करिअरच्या संधी शोधल्या पाहिजेत.”
रोख रक्कम व प्रशस्तीपत्राने गौरव
या सोहळ्यात कोपरगाव शहरातील इ. १०वीत विविध विद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व नगरपरिषद कर्मचारी यांच्या मुलां मुलींनी विविध परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगररचना विभाग प्रमुख अश्विनी पिंगळ यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना लाड यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत कडू, संजय उदावंत, उप-मुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
