आधुनिक काळात शेती क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब होणे आवश्यक:-राजभवन सचिव डॉ. प्रशांत नारनवरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महाराष्ट्राचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार राज्यात नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संधी निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळात शेतीक्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यभावनाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
कृषी महाविद्यालय, पुणे येथे विकसित करण्यात येत असलेल्या वसुंधरा नैसर्गिक शेती आधारित प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. प्रशांत नारनवरे
बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, राजभवनातील उपसचिव डॉ. राममूर्ती व नियंत्रक डॉ. नितीन देशपांडे, कृषी महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विभागीय फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की नैसर्गिक शेतीच्या यशासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे. कृषी विद्यापीठातील नामवंत प्राध्यापकांनी पायाभूत विषयांवरील आपली व्याख्याने सुलभ व शेतकरी सुलभ पद्धतीने तयार करून याचे व्हिडिओ माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील विविध विषयांमधील ज्ञान व कौशल्य यांच्या आधारे उद्यमशील कृषी उद्योजक घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे. कृषी पदवीधरांना अधिक प्रात्यक्षिकाधिष्ठित शिक्षण देणे आवश्यक असून पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमुळे निर्माण झालेली ज्ञान व कौशल्यतील तफावत दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच व्यापक कार्यक्षेत्रातील लोकाभिमुख ज्ञान व कौशल्य विकसित करण्याच्या तंत्राचा समावेश अभ्यासक्रमात करावा असे त्यांनी स्पष्ट केले. आपली पारंपारिक भारतीय शेतीपद्धती ही पशुपालनावर आधारित असल्यामुळे अधिक सुरक्षित होती मात्र वाढती लोकसंख्या आणि रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. शेती हे एक शास्त्र आहे, ती केवळ तर्कावर आधारित जोखीम नाही असे स्पष्ट करत त्यांनी शेतीतील प्रयोगशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. एकपीकपद्धतीमुळे जमिनीचे नैसर्गिक आरोग्य बिघडत असून त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. मातीचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी पीकफेरपालट अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील दरी कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सचिवांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार विद्यापीठ कार्यरत असून, विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या उद्यमशीलतेला चालना देऊन त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संसाधन निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विकसित करून त्यांचा प्रभावी प्रचार व प्रसार केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या भेटीप्रसंगी या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कृषी महाविद्यालयातील अनुभव आधारित अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. महानंद माने यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या नैसर्गिक शेती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रासह संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचा आढावा सादर केला. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *