कृषि यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने बदलत्या हवामानावर मात करणे शक्य:-सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
शेतीमध्ये आव्हाने खूप आहेत. आजच्या काळात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या हवामानाला तोंड देणे अवघड होत चालले आहे. परंतु शेतकरी बांधवांनी न डगमगता या आव्हानांचे रुपांतर संधीमध्ये करावे. कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जागतिक हवामान बदलावर आपण मात करू शकतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे अखिल भारतीय समन्वयीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी व कृषि महाविद्यालय, हाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र बनसोड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय समन्वयीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, जामखेडचे तालुका कृषि अधिकारी श्री. रवींद्र घुले, प्रगतशील शेतकरी डॉ. दिपक वाळूंजकर उपस्थित होते.


यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. दत्तात्रय सोनवणे म्हणाले की हे महाविद्यालय तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबध्द आहे. शेतीला यांत्रिकीकरणाची जोड गरजेची असल्याने या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे महाविद्यालय विक्री केंद्र सुरु करणार आहे. यामध्ये बियाणे, जैविक खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, विविध प्रकाशने या केंद्रावर उपलब्ध होतील असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी यांनी केले. श्री. रवींद्र घुले यांनी शासनाच्या शेतकर्यांसाठी उपलब्ध असलेल्या यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. दिपक वाळूंजकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले. तांत्रिक सत्रामध्ये शास्त्रज्ञ डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी मफुकृवि विकसित आधुनिक कृषि अवजारे व यंत्रे, डॉ. अंबादास मेहेत्रे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, डॉ. रविकिरण राठोड यांनी ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, प्रा. महेश पाचारणे यांनी ड्रोन-ऊस शेतीसाठी वरदान, डॉ. संजय भांगरे यांनी खोडवा ऊस व्यवस्थापनाकरीता उपयुक्त यांत्रिकीकरण, डॉ. अनिकेत गायकवाड यांनी सूक्ष्म अन्नद्रव फुले मायक्रो ग्रेड या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी, महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रगतशील शेतकरी प्रद्युम्न महाजन यांनी ड्रोनबाबत मार्गदर्शन करून फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पाचारणे यांनी तर आभार डॉ. निकिता धाडगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील 75 शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *