भात पिकाच्या निर्मिती करिता जलद संकरीकरण कार्यक्रम राबविणे आवश्यक:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
नवीन वाणांची निर्मिती करताना जलद संकरीकरण कार्यक्रम राबवून कमी वेळेत वाण निर्मिती करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकर्यांना लवकर तयार होणारे, कीड रोगास प्रतिकारक असलेले व अधिक उत्पादन देणारे असे विविध प्रकारचे भाताचे वाण उपलब्ध होतील. याकरिता जलद संकरीकरण कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्रास कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर व कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळचे प्रभारी अधिकारी डॉ. तुकाराम भोर उपस्थित होते.
कृषि संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांशी बोलतांना संशोधन केंद्रातून विकसित झालेले फुले कोलम, फुले मावळ-7, फुले मावळ- 8 या नवीन वाणांचा प्रसार करण्यासाठी या वाणांचे मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन करून बियाणे शेतकर्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश कुलगुरूंनी दिले. त्यांनी यावेळी इंद्रायणी या वाणाला करपा रोगप्रतिकारक व सुवासिक असा पर्यायी वाण विकसित करण्यासाठी संशोधनावर भर देण्याकरिता सुचविले. या भेटीदरम्यान कुलगुरू डॉ. गडाख यांनी संशोधन केंद्रातील विविध संशोधन प्रकल्पांचा व कार्याचा आढावा घेतला. त्यांनी संशोधन केंद्राच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले. यावेळी डॉ. तुकाराम भोर यांनी कृषी संशोधन केंद्रातील विविध संशोधन प्रकल्प व भात बिजोत्पादन कार्यक्रम याविषयी सादरीकरण केले. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *